२०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार का? रोहित शर्माचं एका वाक्यात उत्तर; सस्पेन्स कायम


 ‘ऑक्टोबर २०२७ अजून खूप दूर आहे, तेव्हा पाहू’ — हिटमॅनच्या वक्तव्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नसताना आता खुद्द रोहित शर्माने दिलेल्या उत्तरामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये एका चाहत्याने रोहितला थेट २०२७ च्या वनडे विश्वचषकाबाबत प्रश्न विचारला. ‘तू २०२७ च्या विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य असशील का?’ असा सवाल करण्यात आला. त्यावर रोहितने केवळ एका वाक्यात उत्तर देत म्हटले, ‘ऑक्टोबर २०२७ अजून खूप दूर आहे. तेव्हा पाहू.’

रोहितच्या या उत्तरामुळे त्याच्या भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. त्याने विश्वचषकात खेळण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केलेली नाही आणि निवृत्तीची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

‘बस परेड आता शक्य वाटत नाही’

याच कार्यक्रमात रोहितला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. भारताने २०२७ चा विश्वचषक जिंकल्यास २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर मुंबईत काढण्यात आलेल्या खुल्या बसमधील विजयी मिरवणुकीप्रमाणे पुन्हा जल्लोष होईल का, असे विचारण्यात आले.

यावर रोहितने, ‘मला वाटत नाही की आता बस परेड शक्य आहे,’ असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

२०२३ ची अंतिम लढत अजूनही मनात

२०२३ च्या वनडे विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषक हातातून निसटल्याची ती निराशा आजही भारतीय चाहत्यांच्या मनात ताजी आहे.

रोहितने आतापर्यंत तीन वनडे विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र, विश्वचषक विजेतेपद त्याच्या वाट्याला आलेले नाही. त्यामुळे २०२७ च्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यास ती त्याच्यासाठी कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची संधी ठरू शकते.

बीसीसीआयकडूनही दरवाजे बंद नाहीत

रोहितच्या वनडे भवितव्याबाबत बीसीसीआयकडूनही अद्याप स्पष्ट निर्णय समोर आलेला नाही. मुंबईत झालेल्या बैठकीत संघाचे कर्णधार, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर रोहितच्या संघातील स्थानाबाबत विचारले असता बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी त्याच्या सध्याच्या फॉर्मचा दाखला दिला. रोहितचा फॉर्म पाहता त्याच्या संघातील स्थानावर आताच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

त्यामुळे बीसीसीआयने रोहितसाठी वनडे संघाचे दरवाजे बंद केलेले नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, खुद्द रोहितने ‘ऑक्टोबर २०२७ अजून दूर आहे’ असे म्हणत निर्णयाची दिशा स्पष्ट केलेली नाही.

बीसीसीआयची भूमिका आणि रोहितचे सूचक उत्तर यामुळे २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी ‘हिटमॅन’च्या सहभागाचे गूढ सध्या कायम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या