मानलं भावा तुला! वयाच्या ३६व्या वर्षीही शमीचा दमदार आत्मविश्वास; कमबॅकबाबत म्हणाला, ‘मी अजूनही शिकतोय...’

 


मुंबई : भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मोहम्मद शमीने दुलीप करंडक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीची झलक दाखवत कमबॅकचे संकेत दिले आहेत. पूर्व विभागाकडून खेळताना शमीने आपल्या अनुभवाचा प्रभाव पाडला. अंतिम सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या जोरावर पूर्व विभागाने तब्बल १३ वर्षांनंतर दुलीप करंडकावर नाव कोरले.

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर शमीने आपल्या गोलंदाजीतील आव्हाने आणि रणनीतीबाबत स्पष्ट भाष्य केले. वाढते वय आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही आपला आत्मविश्वास कायम असल्याचे त्याच्या वक्तव्यातून दिसून आले.

‘मी अजूनही शिकतोय...’

शमी म्हणाला, “मी नेहमी काही ना काही शिकत असतो आणि पुढेही शिकत राहायचं आहे.” चेपॉकच्या खेळपट्टीवर पारंपरिक स्विंगला फारशी साथ मिळत नव्हती. उसळीही कमी होती. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या लाईन आणि लेंथवर विश्वास ठेवून गोलंदाजी करणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

उष्ण वातावरणात रिव्हर्स स्विंगचा प्रभावी वापर करता आला, तर त्याचा फायदा घेण्यावर आपला भर असल्याचेही शमीने स्पष्ट केले. विशेषतः सेट झालेल्या फलंदाजांविरुद्ध केवळ वेगाच्या जोरावर विकेट मिळत नाही. त्यासाठी ठरावीक योजना आखून गोलंदाजी करावी लागते, असे त्याने सांगितले.

शमीची ‘सेटअप’ची रणनीती

फलंदाजाला आधी चेंडू बाहेरच्या दिशेने खेळण्याची सवय लावायची आणि त्यानंतर अचानक वेगाने आत येणाऱ्या चेंडूने त्याला अडचणीत आणायचे, अशी रणनीती शमीने सांगितली.

“चेंडू सातत्याने फलंदाजापासून दूर टाकायचा, त्याला त्या चेंडूची सवय लावायची आणि मग अचानक एक चेंडू वेगाने आत आणून त्याला अडकवायचं,” असे शमीने स्पष्ट केले.

त्याच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात भारतीय संघात पुनरागमनासाठी तो किती गंभीरपणे तयारी करत आहे, याचीही झलक मिळाली.

पूर्व विभागाची १३ वर्षांनंतर बाजी

अंतिम सामन्यात पूर्व विभागाने पहिल्या डावात तब्बल ७०८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दक्षिण विभागाचा डाव ३३६ धावांत आटोपला. त्यामुळे पूर्व विभागाला तब्बल ३७२ धावांची आघाडी मिळाली.

सामन्यातील बहुतांश औपचारिकता पूर्ण झाल्याने पूर्व विभागाने दक्षिण विभागावर फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवसअखेर पूर्व विभागाच्या ५ बाद २१२ धावा होत्या.

अखेरच्या दिवशीही पूर्व विभागाने आक्रमकपणे फलंदाजी सुरू ठेवली. सामना थांबवण्यात आला तेव्हा त्यांची धावसंख्या ७ बाद ३८८ अशी होती. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला; मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे पूर्व विभागाला विजेतेपद मिळाले.

कुरेशी-अनुकूलची दमदार भागीदारी

पूर्व विभागाच्या दुसऱ्या डावात महंमद कौनियान कुरेशीने नाबाद ११६ धावांची शानदार खेळी केली. १९० चेंडूंचा सामना करताना त्याने १३ चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याला अनुकूल रॉयने ६४ धावांची उपयुक्त साथ दिली.

दोघांनी २३७ चेंडूंमध्ये तब्बल १५० धावांची भागीदारी करत दक्षिण विभागाच्या गोलंदाजांवर दबाव वाढवला. अनुकूल बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात पूर्व विभागाने डाव घोषित केला.

दक्षिण विभागाने करुण नायर, मयांक अग्रवाल आणि साई किशोर यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका या सामन्यात संघाला बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या