‘सरकारचा माज उतरवायचा’; राजकीय दबाव आणि ईडीच्या कारवाईवरून महायुतीवर निशाणा
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषण करणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. तसेच, पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या व्यक्तींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील मराठा समाजातील व्यक्तींनीही परिस्थिती गांभीर्याने घेऊन सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘१२ सप्टेंबरला अंतरवलीत या’
“१२ सप्टेंबरला अंतरवली सराटीत सर्वांनी यावे. याच दिवशी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. या सरकारचा माज उतरवायचा आहे,” असे जरांगे यांनी म्हटले.
सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. व्यावसायिकांवर कारवाई केली जाते किंवा त्यांना सत्ताधारी पक्षात सहभागी करून घेतले जाते, असेही ते म्हणाले.
‘मग्रुरीचे सरकार राज्याला परवडणार नाही’
राजकीय नेत्यांसोबतच मराठा समाजातील व्यावसायिकांनाही जरांगे यांनी सावध केले. सत्तेचा वापर करून राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
“इतकी मग्रुरी आणि हुकूमशाही राज्याला परवडणारी नाही. राजकीय मराठ्यांचे हाल होत आहेत, तसेच व्यावसायिक मराठ्यांनीही सावध राहण्याची गरज आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांबाबतही परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत जरांगे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका केली.
‘अजितदादांचं काय झालं, अजून कळलेलं नाही’
यावेळी जरांगे यांनी अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत या प्रकरणाच्या तपासाबाबतही प्रश्न उपस्थित केले. “अजितदादांचं काय झालं, हे अजून कोणालाच कळलेलं नाही. अहवाल येणार, तपास सुरू आहे, असेच सांगितले जात आहे. सोन्यासारखा माणूस गेला. या घटनेकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीवरही टीका
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांवर जरांगे यांनी टीका केली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने मराठा समाजासाठी काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मात्र, महाविकास आघाडीची बाजू घेत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी महायुती सरकारवरही जोरदार प्रहार केला. “पूर्वीच्या सरकारांनी काही दिले नाही, पण सध्याच्या सरकारने दिलेले पुन्हा अडचणीत आणले,” असा आरोप जरांगे यांनी केला.
0 टिप्पण्या