जरांगेंची मुंबईकडे कूच; १५ सप्टेंबरला अंतरवालीतून प्रस्थान

 


१९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा निर्धार; मराठा बांधवांना शांततेचे आवाहन

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करणार असून, १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचा संभाव्य मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणेही जरांगे यांनी जाहीर केली. त्यानुसार १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीहून प्रस्थान करून पाटोदा येथे मुक्काम करण्यात येणार आहे. १६ सप्टेंबरला श्रीगोंदा, १७ सप्टेंबरला हडपसर आणि १८ सप्टेंबरला खोपोली किंवा कोपरखैरणे परिसरात मुक्काम करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

एकाच मार्गाने, शिस्तीत पुढे जा

मुंबईकडे येणाऱ्या मराठा समाजबांधवांनी स्वतंत्रपणे मार्ग बदलू नये, एकाच मार्गाने आणि शिस्तीने पुढे जावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची दगडफेक, हिंसाचार अथवा कायद्याचे उल्लंघन होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत आणि त्यानंतर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आंदोलन लोकशाही आणि शांततेच्या मार्गानेच सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पोलिसांनी अडवू नये

मुंबईकडे निघणाऱ्या मराठा समाजबांधवांना पोलिस किंवा प्रशासनाने अडथळे निर्माण करू नयेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. रस्त्यांवर बॅरिकेड उभारून आंदोलकांना रोखू नये. सरकारने आंदोलनासाठी जे नियम घालून दिले जातील, ते पाळण्याची तयारी आहे; मात्र आंदोलन मुंबईतच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईला येणे शक्य नसलेल्या समाजबांधवांनी आर्थिक अडचणी असतानाही कर्ज काढून मुंबई गाठू नये. त्याऐवजी मुख्य रस्त्यांवर येऊन आंदोलनकर्त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना पाठिंबा व आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

न्यायालयाच्या भूमिकेबद्दल आभार

न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल जरांगे यांनी आभार व्यक्त केले. न्यायदेवता गरीब आणि सामान्य जनतेवर अन्याय करत नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मराठा समाजबांधवांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान राखावा, असे आवाहन केले.

'तर दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद करा'

आंदोलनादरम्यान एखाद्या मराठा तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा त्याचे रक्त सांडले, तर शांततेच्या मार्गाने दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असे आवाहन जरांगे यांनी केले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन करावे आणि आंदोलन शांततेत सुरू ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

'जायकवाडीचे पाणी संपूर्ण मराठवाड्यात फिरवतो'

यावेळी जरांगे यांनी सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करण्याची तयारी असल्याचे सांगतानाच, आंदोलन मात्र मुंबईतच होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

“फक्त माझं हे आंदोलन पूर्ण होऊ द्या, मराठवाड्यात संपूर्ण जायकवाडीच्या धरणाचं पाणी फिरवतो,” अशी नवी घोषणाही त्यांनी केली.

मुंबईत जाऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करताना जरांगे भावुक झाले. मराठा समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जरांगेंच्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबईकडेच्या कूचीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या