सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंब आमनेसामने; युगेंद्रांच्या मुलाखती, सुनेत्रांच्या गाठीभेटी
पुणे : अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीतील पवार विरुद्ध पवार संघर्षाला पुन्हा उधाण येण्याची चिन्हे आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार समर्थक स्वतंत्र पॅनेलच्या तयारीत असल्याने ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ची लढत जवळपास निश्चित मानली जात आहे.
शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही इच्छुक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप आणि शिवसेनाही निवडणुकीत सक्रिय असल्याने समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये युतीबाबत अद्याप ठोस चर्चा झालेली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे समझोता न झाल्यास स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची तयारी दोन्ही बाजूंनी सुरू आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे त्याआधी समझोता होतो की बारामतीत पुन्हा पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाची नवी फेरी रंगते, याकडे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या