मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा मुंबईकडे वळली आहे. मनोज जरांगे-पाटील आज, मंगळवारी सकाळी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असलेल्या मागण्या मान्य करता येतील; मात्र कायदा किंवा न्यायालयीन नियमांच्या बाहेरच्या मागण्या पूर्ण करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आंदोलकांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्याचा दावा केला. काही मागण्या न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असून त्यावर न्यायालयीन तसेच संवैधानिक मार्गानेच निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
‘मुंबईतील आंदोलनाचा पुनर्विचार करा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्यास गणेशभक्तांना आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले.
“गणेशपर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करून गणेशभक्तांना असुविधा होईल, असे वागणे कोणासाठीही योग्य नाही. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाचा पुनर्विचार व्हावा,” असे आवाहन फडणवीस यांनी केले.
‘चर्चेची दारे बंद केलेली नाहीत’
जरांगे-पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यघटनेला अनुसरून असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र कायदा आणि न्यायालयीन नियमांच्या बाहेरच्या मागण्या मान्य करता येणार नाहीत.”
सरकारने चर्चेची दारे बंद केलेली नसून संवैधानिक मार्गाने प्रश्न सोडवण्याची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समान नागरी कायद्यावर समितीचा अहवाल महत्त्वाचा
समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबाबतही मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच समिती स्थापन केली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, ‘मी एकटाच मुंबईला जातो’
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे मुंबईकडे रवाना होण्याची घोषणा केली होती. “माझ्यासोबत कोणत्याही मराठा आंदोलकांनी येऊ नये. मी सांगेल त्या वेळी सर्वांनी मुंबईत यावे,” असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर मोठ्या जमावाने आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर आपण एकट्याने मुंबईला जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत केवळ चार जण असतील, तसेच दोन रुग्णवाहिका आणि दोन वाहने असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
१९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाची घोषणा
मुंबईत पोहोचल्यानंतर १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकडे जाण्याचा मार्ग पूर्वीप्रमाणेच असेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी रात्रीपासून जरांगे यांनी सलाइन घेणे बंद केले असल्याने त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबईकडे होणाऱ्या या प्रवासाकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
एकीकडे सरकारकडून कायदा आणि संविधानाच्या चौकटीबाहेर मागण्या मान्य होणार नसल्याचा स्पष्ट इशारा, तर दुसरीकडे जरांगे यांचा मुंबईत उपोषणाचा निर्धार यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
0 टिप्पण्या