मोठ्या पॅकेजचे आमिष, आधी पैसे घेतले; नंतर कंपनीच केली बंद!


पुण्यात ३९ कर्मचाऱ्यांकडून तब्बल ७७ लाख ९१ हजार रुपये उकळल्याचा आरोप; संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : मोठ्या पगाराचे आणि आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवून तरुणांना कंपनीत नोकरीला लावायचे, त्यानंतर पॅकेजच्या ३० टक्के रक्कम आगाऊ घ्यायची आणि काही महिन्यांत कंपनीच बंद करून गायब व्हायचे, असा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. ‘क्रिएटिव्ह वेब सोल्युशन’ या कंपनीने ३९ कर्मचाऱ्यांकडून तब्बल ७७ लाख ९१ हजार ४०० रुपये घेतल्याचा आरोप असून, या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश वानरखेडे ऊर्फ आशिष रहाटे, व्यवस्थापकीय संचालक तेजश्री खटाळकर, मनुष्यबळ विभागातील प्रसन्न पद्माकर राव आंबेकर, सागर सुरेश शेळार आणि मानसी मंगेश शेळार यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कंपनीची स्थापना केली. त्यानंतर आकर्षक पगार आणि मोठ्या पॅकेजचे आमिष दाखवत तक्रारदार महिलेसह अनेकांना नोकरीची ऑफर देण्यात आली. नोकरी देताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पॅकेजच्या सुमारे ३० टक्के रक्कम आगाऊ घेण्यात आली.

तक्रारदार महिलेकडूनही दोन लाख ४८ हजार रुपये घेण्यात आले. मात्र, नोकरी सुरू झाल्यानंतर तिला तब्बल चार महिन्यांचा पगार देण्यात आला नाही. दरम्यान, कंपनीकडून कोणतीही समाधानकारक माहिती न देता अखेर कंपनीचे कामकाजच बंद करण्यात आले.

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्यासोबत काम करणाऱ्या अन्य ३८ कर्मचाऱ्यांकडून ७५ लाख ४३ हजार ४०० रुपये घेण्यात आले होते. तक्रारदाराची रक्कम आणि इतर कर्मचाऱ्यांकडून घेतलेली रक्कम मिळून हा आकडा ७७ लाख ९१ हजार ४०० रुपयांवर जातो.

नोकरीच्या नावाखाली मोठ्या पॅकेजचे स्वप्न दाखवून कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर कंपनी बंद करण्यात आल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपींनी पूर्वनियोजित पद्धतीने संगनमत करून आर्थिक फसवणूक केली का, याचा तपास चतुःशृंगी पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या