‘लाखो आंदोलकांना मुंबईत येण्याचे आवाहन, वाहतूक आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका’; गणेशोत्सवाचेही कारण
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आझाद मैदान येथे १८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण, धरणे आणि आंदोलन करण्यासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलकांची संभाव्य संख्या, जरांगे यांची सार्वजनिक वक्तव्ये, मुंबईतील गणेशोत्सव आणि त्यातून निर्माण होणारी सार्वजनिक सुरक्षितता व सुव्यवस्थेची परिस्थिती यांचा दाखला पोलिसांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या दिशेने कूच करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती फेटाळली आहे.
‘लाखो लोकांना मुंबईत येण्याचे आवाहन’
परवानगी नाकारताना पोलिसांनी जरांगे यांच्या यापूर्वीच्या सार्वजनिक वक्तव्यांचा दाखला दिला आहे. उपोषणादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्याचे पोलिसांनी आदेशात नमूद केले आहे.
तसेच ‘पंचेचाळीस लाख वाहने मुंबईत आणणार’, ‘गनिमी काव्याने मुंबईत या’ आणि परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच, अशा स्वरूपाची वक्तव्ये केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
त्यामुळे परवानगी अर्जात नमूद केलेल्या आंदोलकांच्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष आंदोलनाच्या वेळी सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या अधिक असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पूर्वीची परिस्थिती कायम असल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांच्या आदेशानुसार, जरांगे यांनी नव्या अर्जातही १८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण, धरणे आणि आंदोलन करण्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यापूर्वी परवानगी नाकारताना विचारात घेतलेल्या परिस्थितीत कोणताही मूलभूत बदल झालेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे.
दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहारांवर परिणामाची भीती
आझाद मैदान परिसरातील आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालयीन कामकाज आणि सार्वजनिक वाहतूक यावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आंदोलनाचे संभाव्य स्वरूप आणि गर्दीचा विचार करता सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाचेही कारण
परवानगी नाकारण्यामागे सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचाही महत्त्वाचा आधार पोलिसांनी घेतला आहे. १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत असल्याने शहरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
या काळात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी आदेशात नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला
आंदोलनाला परवानगी नाकारताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयातील ‘अमित सहाणी’ प्रकरणातील निर्देश, मुंबई उच्च न्यायालयाचे संबंधित आदेश तसेच सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुकांसंदर्भातील २०२५च्या नियमावलीतील विविध तरतुदींचाही आधार घेतला आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जरांगे यांनी नव्याने अर्ज केल्यास, त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करून सक्षम प्राधिकरणाकडून निर्णय घेतला जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्याच्या भूमिकेवर कायम राहतात का आणि सरकार-पोलिस प्रशासन या परिस्थितीला कसे सामोरे जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या