पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय करण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. येत्या २७ सप्टेंबरला नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनातून सुनेत्रा पवार यांच्या नव्या राजकीय भूमिकेची औपचारिक सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा सातत्याने ऐकायला मिळत होती. आता सुनेत्रा पवार यांना केंद्रस्थानी ठेवून नव्या राजकीय प्रतिमेची उभारणी करण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांत त्यांचे दौरे, सभा आणि महिला मतदारांशी थेट संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जाते.
पक्षसंघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, संघटनेतील जुन्या नेत्यांसोबत नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज पक्षांतर्गत चर्चेत पुढे आली आहे. त्यामुळे आगामी काळात संघटनात्मक पातळीवर काही बदल होण्याची शक्यता आहे.
पक्षाला पुन्हा संघटित करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीमची मदत घेतली जात असल्याचेही सांगितले जाते. पक्षाची प्रतिमा, संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क याबाबत त्यांच्या टीमकडून काही सूचना करण्यात आल्याची चर्चा आहे. या सूचनांवर पक्षातील विविध स्तरांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही महत्त्वाच्या पदांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पदाबाबत अधिकृत पातळीवर स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पक्षाच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबतही पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षाच्या आगामी अधिवेशनात संघटनात्मक पदांबाबत काही निर्णय होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आमदारांमध्येही अस्वस्थता?
अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे यावे, अशी पक्षातील काही नेत्यांची इच्छा असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही.
दरम्यान, मंत्रालयीन पातळीवर मतदारसंघातील कामांसाठी आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नाराजी पक्षातील काही आमदारांमध्ये असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नेतृत्वासमोर संघटनात्मक प्रश्नांसोबतच सरकारमधील पक्षाची प्रभावी भूमिका कायम ठेवण्याचेही आव्हान आहे.
महिला मतदारांवर विशेष लक्ष
सुनेत्रा पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे समजते. महिला मेळावे, संवाद कार्यक्रम आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बैठका यामधून सुनेत्रा पवार यांची स्वतंत्र राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबरच्या नाशिक अधिवेशनातून या रणनीतीची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीचे नेतृत्व, संघटनात्मक बदल आणि सुनेत्रा पवार यांची राज्यातील राजकीय भूमिका यामुळे आगामी काळात पक्षाच्या राजकारणाला कोणते वळण मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या