प्रेमविवाहाची ‘शिक्षा’! एक लाखांचा दंड, मारहाण अन् अखेर कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

 


अहिल्यानगर : मुलीने जातीतीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्याने कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे समोर आला आहे. नंदीवाले तिरमली समाजाच्या जातपंचायतीने संबंधित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचा, त्यापैकी काही रक्कम वसूल केल्यानंतर उर्वरित पैसे न दिल्याने मारहाण केल्याचा आणि त्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पीडित कुटुंबासोबत कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.

प्रेमविवाहानंतर दबाव वाढल्याचा आरोप

पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीने समाजातीलच एका तरुणासोबत प्रेमविवाह केला. या विवाहाची नोंदणी झाल्यानंतर समाजातील काही व्यक्तींनी पारंपरिक पद्धतीनेच विवाह करण्याचा आग्रह धरत कुटुंबावर दबाव आणला.

यानंतर धामोरी येथे समाजाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत कुटुंबाकडे ५० हजार रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आली. पुढे एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आर्थिक अडचणी असूनही कुटुंबाने कर्ज काढून ५० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्कम न दिल्याने वाद वाढला.

‘पैसे न दिल्याने मारहाण’

उर्वरित रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर कुटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर काही काळाने कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचे पीडित वडिलांचे म्हणणे आहे.

‘आपल्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे’, हे सुरुवातीला कुटुंबाला लक्षात आले नाही. मात्र, समाजातील विविध कुटुंबांकडून लग्नसमारंभ तसेच इतर सुख-दुःखाच्या कार्यक्रमांची आमंत्रणे येणे अचानक बंद झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबाशी कोणीही संबंध ठेवू नये, त्यांना सामाजिक कार्यक्रमांना बोलावू नये, अशा प्रकारच्या सूचना आणि धमक्या देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पोलिसांत धाव

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे आणि स्थानिक पदाधिकारी पीडित कुटुंबासोबत कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी संबंधित जातपंचायतीविरोधात तक्रार दाखल करून सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २०१६ मध्ये सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा लागू करण्यात आला. तरीही जातपंचायतींच्या माध्यमातून सामाजिक बहिष्काराच्या घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले. मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे कुटुंबाला बहिष्कृत केल्याचा आरोप असून, संबंधित नंदीवाले समाजातील जातपंचायतीविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तक्रारीतील तथ्य आणि संबंधितांची भूमिका तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या