लातूर : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. विकासकामांसाठी राखीव असलेला निधी सध्याच्या संकटात शेतकरी आणि ग्रामीण भागाला मदत करण्यासाठी वळवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार सध्या मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत आहेत. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांनंतर त्यांनी लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे शेतकऱ्यांची भेट घेतली. बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचनामे आणि नुकसानभरपाईबाबत प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
खरीप हंगामाचे मोठे नुकसान; रब्बीचीही चिंता
खरीप हंगामात ७५ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. पावसाअभावी रब्बी हंगामाची शक्यताही कमी झाली असून, पुढील काळात जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुढील दहा महिने शेतकरी आणि सर्वसामान्यांना कसे जगवायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी,” अशी मागणी पवार यांनी केली.
‘विकासकामांचा पैसा सध्या शेतकऱ्यांसाठी वापरा’
सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांना देण्यात येणारा निधी तात्पुरता वळवून संकटग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वापरावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्याचबरोबर राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचा पाहणी दौऱ्यात आढावा
किनगाव येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. नुकसान झाल्यानंतरही पंचनामे वेळेत होत नसल्याची आणि मदतीची प्रक्रिया संथ असल्याची तक्रार त्यांनी रोहित पवार यांच्याकडे केली.
या पाहणी दौऱ्यातील परिस्थितीचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
‘अजित पवार असते तर नियम-अटींमध्ये अडकले नसते’
रोहित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचाही संदर्भ दिला. “आज अजित पवार असते तर ते नियम आणि अटींमध्ये अडकले नसते. ते जनतेसाठी काम करणारे नेतृत्व होते आणि जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणीव होती,” असे ते म्हणाले.
महायुतीतील नेत्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय घडामोडींमध्ये अधिक रस असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. पक्षांमधील फोडाफोडीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले जात असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन सरकारसमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
0 टिप्पण्या