राहुल गांधींनी पक्षाला बेरोजगार केलं; स्टँडअप कॉमेडी केली तर रोजगार मिळेल, फडणवीसांचा खोचक टोला

 


नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांच्याकडे आता हेच काम उरल्याचे सांगत, त्यांनी स्टँडअप कॉमेडीचा व्यवसाय स्वीकारावा, असा खोचक सल्लाही फडणवीसांनी दिला.

“राहुल गांधींनी स्टँडअप कॉमेडीचं काम हाती घ्यावं. तिथे मिमिक्री केली तर त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. कारण त्यांनी त्यांच्या पक्षाला बेरोजगार करून ठेवलं आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली. नागपूर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दोन हजारांवरील यूपीआय व्यवहार नाकारण्याची भूमिका चुकीची

दरम्यान, यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला विरोध करत पेट्रोल पंप चालकांनी १५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय पेमेंट स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेवरही फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली.

यूपीआयमुळे पेट्रोल पंप चालकांचा व्यवसाय वाढला असून व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांवरील यूपीआय व्यवहार स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

यूपीआय व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क अत्यल्प असून ते सर्व व्यवहारांना लागू होणार नाही. केवळ काही विशिष्ट व्यवहारांवरच शुल्क आकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शुल्काबाबत संसदीय समितीने शिफारस केली असून या समितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे चार नेते होते, असा दावाही फडणवीसांनी केला.

“देशातील व्यवहार वाढवण्यात आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या विषयावर वेगळे नरेटिव्ह तयार करण्याऐवजी डिजिटल व्यवहारांचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत,” असे ते म्हणाले.

नागपूरच्या सौर उद्योगाला नवी दिशा

नागपूरमधील अवादा समूहाच्या सौर मॉड्युल निर्मिती प्रकल्पाचाही फडणवीसांनी उल्लेख केला. सौर मॉड्युल निर्मितीच्या क्षेत्रातील हा मोठा आणि अत्याधुनिक प्रकल्प असून, देशाला सौर क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचे भूमिपूजन २०२४ मध्ये झाले असून सध्या सुमारे पाच हजार कामगार येथे कार्यरत आहेत. या प्रकल्पातील सौर मॉड्युलला मोठी मागणी असून, बदलत्या महाराष्ट्रासह विदर्भ आणि नागपूरच्या औद्योगिक परिसंस्थेचे हे महत्त्वाचे उदाहरण असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रकल्पाच्या विस्ताराचे कामही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या परिवर्तनाला वेग

मुंबईच्या पायाभूत सुविधांबाबतही फडणवीसांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. कोस्टल रोड, बोगदे, पूल आणि विविध वाहतूक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईचे रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेतही पुढील दोन-तीन वर्षांत मेट्रोसारख्या आधुनिक डब्यांचा समावेश करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने मंजुरी घेऊन शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दहा ते बारा वर्षांचा कालावधी लागू शकतो; मात्र त्याची सुरुवात झाली असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.

महाराष्ट्रात मालवाहतूक रेल्वेचे जाळे उभारणार

महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मालवाहतूक रेल्वेचे जाळे उभारण्याच्या दृष्टीनेही सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गाची उभारणी करताना रेल्वे मार्गासाठी आवश्यक जागा राखून ठेवण्यात आली आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करण्यासाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाची गरज आहे. बंदरांपासून नाशिक, जालना आणि वर्धा येथील ड्राय पोर्टपर्यंत तसेच पुढे गडचिरोलीपर्यंत मालवाहतूक रेल्वेचे जाळे विस्तारण्याची सरकारची योजना आहे.

या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांना बंदराशी जोडले जाईल आणि त्याचा थेट फायदा राज्याच्या औद्योगिकीकरणाला होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या