पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्याला दुचाकीवरून कट मारल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याचवेळी गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील गर्दीत मोहोळ यांचा चार वाहनांचा ताफा नेण्यात आल्याच्या घटनेवरूनही पुण्यात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ‘सुरक्षेच्या कारणावरून सामान्य नागरिकावर कारवाई होत असेल, तर गर्दीच्या ठिकाणी व्हीआयपी ताफा नेण्याबाबत नियम काय सांगतात?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोहोळ यांचा ताफा संचैती चौकातून जात होता. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने वाहन अतिशय वेगाने व बेदरकारपणे चालवत मंत्र्यांच्या वाहनाला कट मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी ईश्वर लक्ष्मण भिकुले यांच्या तक्रारीवरून नाना पेठेतील शुभम विजय वनित याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई केली असून, संबंधित दुचाकीस्वाराला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्या वाहनचालकामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन चालविल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात दगडूशेठ गणपती मंदिराच्या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनासाठी मोहोळ पुण्याच्या मध्यवर्ती भागात आले होते. यावेळी सायंकाळच्या गर्दीच्या वेळी त्यांच्या वाहनांचा ताफा या परिसरातून नेण्यात आल्याचे समोर आले. गणेशोत्सवामुळे या भागात मोठी गर्दी असताना वाहनांचा ताफा रस्त्यावरून गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. भाविक आणि नागरिकांना याचा त्रास झाल्याची चर्चा सोशल माध्यमांवरही सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या ताफ्याला कट मारल्याप्रकरणी सामान्य दुचाकीस्वारावर तातडीने गुन्हा दाखल होतो, तर गर्दीच्या भागात व्हीआयपी ताफा नेण्याच्या निर्णयाबाबत जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था आवश्यक असते. मात्र, त्याचवेळी सार्वजनिक रस्ते आणि गर्दीच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना कमीतकमी त्रास होईल, याची जबाबदारी प्रशासनाचीही असते. त्यामुळे दोन्ही घटनांकडे समान निकषाने पाहिले जाणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे सुरक्षेच्या नावाखाली सामान्य नागरिकावर कारवाई आणि दुसरीकडे व्हीआयपी ताफ्यासाठी गर्दीच्या रस्त्यांचा वापर—या विरोधाभासावर आता प्रशासन काय भूमिका घेणार, हा पुण्यातील चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
0 टिप्पण्या