भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंडनमध्ये आवर्जून भेट घेतली. शिंदे यांच्या लंडन दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर विराटने स्वतःहून त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. या भेटीत महाराष्ट्रातील विकासकामांपासून युवकांना संधी देण्यापर्यंत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
विराटसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज क्रिकेटपटूने स्वतःहून भेट घेतल्याने शिंदे यांनी त्याच्या साधेपणाचे आणि नम्रतेचे कौतुक केले. “एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराट किती साधा आणि नम्र आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला,” असे शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
विकासकामांवर विराटशी चर्चा
शिंदे यांनी सांगितले की, यापूर्वीही विराटसोबत त्यांची भेट झाली आहे. मात्र, यावेळी दोघांना निवांतपणे संवाद साधता आला. लंडन दौऱ्यात मिळालेल्या पुरस्कारांबाबतही विराटशी चर्चा झाली.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा मुद्दा चर्चेत असताना ‘थर्ड मुंबई’, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई किनारी मार्ग आणि मेट्रो प्रकल्प, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती विराटला देण्यात आली.
महाराष्ट्रात झालेला विकास मोठा आणि अभूतपूर्व असल्याचे विराटने या चर्चेदरम्यान म्हटल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पुरस्कारांमागील कामांचीही माहिती
लंडन दौऱ्यात शिंदे यांना तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले. कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप आणि ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड हे पुरस्कार त्यांना मिळाले.
या पुरस्कारांमागे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, विकासकामे, ‘लाडकी बहीण’ योजना आणि ‘सरकार आपल्या दारी’ यांसारख्या उपक्रमांचा संदर्भ असल्याचे शिंदे यांनी विराटला सांगितले. या विषयांवर झालेल्या चर्चेने विराटलाही आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले.
‘युवा देशाचे भविष्य’
शिंदे आणि विराट यांच्या चर्चेत युवकांचा विषयही महत्त्वाचा ठरला. आजच्या तरुणांना त्यांच्या कला आणि कौशल्याला योग्य व्यासपीठ कसे मिळेल, विविध क्षेत्रांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये ते उत्तम कामगिरी कशी करू शकतील, यावर दोघांनी चर्चा केली.
“आजचा युवा वर्ग हाच देशाचं भविष्य आहे. याबाबत विराटने काही चांगल्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशाला फायदा होऊ शकतो,” असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत केलेले भाषणही अलीकडे चर्चेचा विषय ठरले होते. या दौऱ्यात त्यांना मिळालेले तीन पुरस्कार आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत झालेली भेट यामुळे शिंदे यांचा लंडन दौरा पुन्हा चर्चेत आला आहे.
0 टिप्पण्या