बीड : प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारासाठी बीडमध्ये थांबलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर उद्या दुपारी एकनंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, मार्गातील श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथील नियोजित मुक्काम रद्द करून थेट मुंबई गाठण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
मुंबईकडे जाताना मराठा समाजाने रस्त्यात अडवू नये, असे आवाहन करतानाच आझाद मैदानावर जाण्यापासून रोखल्यास मोठ्या संख्येने मराठा समाजाला मुंबईत बोलावण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘मी मागे हटणार नाही’
“मी मेलो तरी मागे हटणार नाही. मला आज जाता आले नाही, मात्र उद्या दुपारी एकनंतर मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मी शंभर टक्के मुंबईला जाणार आहे,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून काही प्रस्ताव किंवा मसुदा पाठवण्यात आल्याचे सांगत, त्याबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला मुंबईत बोलावण्याची तारीख जाहीर करण्याचे त्यांनी तूर्तास थांबवले असल्याचे सांगितले.
प्रकृती बिघडल्याने बीडमध्ये उपचार
जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना बीडमध्ये उपचार घ्यावे लागले. सलाईन लावल्यानंतर उठता-बसताही येत नसल्याचे त्यांनी सांगितले. नारायणगड येथील महंतांनी सलाईन लावण्याची विनंती केल्याने आपण ती स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“पोटात, पायात आणि हातात प्रचंड आग होत आहे. आज जाता आले नाही, तर उद्या जाईन. मुंबईला जाण्याचा निर्णय बदललेला नाही,” असे जरांगे यांनी सांगितले.
‘अडवल्यास मराठ्यांना मुंबईत बोलावणार’
मुंबईकडे जाताना अडथळे निर्माण करू नयेत, असा इशारा देताना जरांगे यांनी आझाद मैदानावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. “मला मुंबईत आझाद मैदानावर कोण जाऊ देत नाही, ते बघतोच. मला अडवले तर मराठा समाजाला मुंबईत बोलावणार,” असे ते म्हणाले.
लाठीचार्जसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
0 टिप्पण्या