‘आत्ता नाही; भाऊ आंदोलनाच्या मैदानात असताना बहिणीने जेवायला बोलावू नये’, जरांगेंचा सल्ला
अंतरवाली सराटी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना ‘माझे भाऊ’ म्हणत घरी जेवणाचे आमंत्रण दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन जेवायला येतो,’ असे म्हणत त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले; मात्र सध्या आंदोलन सुरू असल्याने जेवणासाठी येणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन जेवायला जाऊ; पण आत्ता नाही. भाऊ मैदानात आंदोलन करत असताना बहिणीने जेवायला बोलावू नये. बहिणीने तेवढा बारकाईने विचार करावा,’ असा टोला जरांगे यांनी लगावला.
‘मुंबईला आम्ही जाणारच’
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या भूमिकेवर जरांगे यांनी पुन्हा एकदा ठामपणा व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांत आपण कोणत्याही शिष्टमंडळाची वाट पाहिली नाही. आपल्या ताकदीवर आंदोलन उभे केले असून मुंबईला जाणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकडे कूच करण्याची तारीख शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलन हे समाजाच्या इच्छेवर सुरू असल्याचा दावा करत सरकारकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, गुन्हे दाखल झाले तरी आपण घाबरणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
कुणबी प्रमाणपत्र शिबिरांवरही संशय
कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सुरू करण्यात आलेल्या शिबिरांच्या उद्देशावरही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केला. ही शिबिरे केवळ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली आहेत की त्यामागे अन्य काही हेतू आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
मिळालेली जात प्रमाणपत्रे भविष्यात रद्द करण्यासाठी कोणाच्या सल्ल्याने अशी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत का, याकडेही लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शिंदेंशी चांगल्या भाषेतच बोललो’
आपल्या भाषेवरून होत असलेल्या टीकेलाही जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्याशी आपण गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या भाषेत संवाद साधला. मात्र, आता ते जातीच्या नव्हे तर पक्षाच्या भूमिकेतून बोलत असल्याचे जरांगे यांनी म्हटले.
काही व्यक्तींमुळे आपले आणि एकनाथ शिं
प्रकृतीकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष
दे यांचे संबंध खराब झाल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, अंतरवाली सराटीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या प्रकृतीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेचे लक्ष आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी जरांगे यांना सात सलाइन देण्यात आल्या. ९ सप्टेंबर रोजी दुपारी एक सलाइन, तर रात्री साडेअकराच्या सुमारास तीन सलाइनद्वारे आयव्ही फ्ल्यूइड देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईला जाण्याचा निर्धार कायम असून आंदोलनाचा पुढील टप्पा कधी आणि कसा असेल, याकडे आता मराठा समाजासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या