ओबीसी आरक्षण, बोगस प्रमाणपत्रांवरूनही सरकारला घेरले; देशव्यापी आंदोलनाचा इशारा
नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जरांगे यांच्यातील भूमिकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सरकारमधील मंत्री वारंवार त्यांच्या भेटीला जातात आणि सरकारची भूमिका झुकलेली दिसते, असा आरोप करत वडेट्टीवार यांनी ‘जरांगेंसाठी सरकारची मान इतकी वाकतेय की पाळीव प्राण्यालाही लाज वाटेल,’ अशी बोचरी टीका केली.
मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असली, तरी जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ते मुंबईत दाखल झाल्यास मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन कसे हाताळायचे, हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र, आंदोलनाला विरोध नसून सरकारने कायदा-सुव्यवस्था आणि सर्व समाजांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
‘सरकार झुकतंय, झुकवणारा हवा’
जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान अनेकदा मंत्री त्यांच्या भेटीला गेले असून, आता पुन्हा सरकारकडून त्याच पद्धतीने चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ‘सरकार झुकतंय, झुकवणारा हवा, त्यामुळे सरकार झुकत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
जरांगे पाटील यांच्याकडून ओबीसी नेत्यांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असतील, तर सरकारने कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी दिले. सरकारमध्ये दम असेल तर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वावरून सवाल
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दाही उपस्थित केला. काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर जागा ओबीसींच्या हातातून गेल्याचे सांगत त्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केले.
‘ओबीसीच्या नावावर प्रमाणपत्र घेऊन कोणी निवडून येत असेल, तर ओबीसी सुरक्षित कुठे आहे? खोट्या प्रमाणपत्रांवर निवडून येणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसी समाजावर आलेले संकट हे सरकारचे पाप असल्याची टीका करत नोकरीतील प्रतिनिधित्वाचाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशभर ओबीसी आंदोलनाची तयारी
ओबीसींच्या प्रश्नांवर आता देशव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. दिल्ली येथे देशभरातील ६३ ओबीसी संघटनांची बैठक झाल्याचा दावा त्यांनी केला.
या बैठकीतून देशव्यापी आंदोलनासाठी संघटनात्मक बांधणी सुरू झाल्याचे सांगत जातनिहाय जनगणना ही प्रमुख मागणी असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. लोकसंख्येच्या प्रमाणात संबंधित समाजाला त्याचा वाटा मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सातत्याने मांडला असून, त्याच मागणीच्या आधारावर देशभर आंदोलन उभारण्याची तयारी असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या