मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या १११ धावांत गुंडाळला. या विजयासह भारताने आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा विजेतेपदावर मोहोर उमटवली.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. विशेष म्हणजे, २०२४ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा हिशेबही भारताने यावेळी चुकता केला.
शेफाली-स्मृतीची वादळी सुरुवात
भारताच्या डावाची सुरुवात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी केली. दोघींनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत पहिल्या विकेटसाठी ७७ चेंडूंत तब्बल १२९ धावांची भागीदारी केली.
शेफालीने अवघ्या २४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत आशिया कपमधील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. तिने ३९ चेंडूंत ५९ धावांची आक्रमक खेळी केली. स्मृती मानधनानेही ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर भारताच्या धावांचा वेग काहीसा मंदावला. मात्र, अखेरच्या षटकांत गुणालन कमलिनीने फटकेबाजी करत केवळ ५ चेंडूंत १५ धावा वसूल केल्या. त्यामुळे भारताने १८० धावांचा टप्पा ओलांडत श्रीलंकेसमोर १८४ धावांचं आव्हान ठेवलं.
भारतीय गोलंदाजांचा श्रीलंकेवर घणाघात
१८४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी अडचणीत आणलं. पहिल्या षटकापासून विकेट मिळवत भारताने श्रीलंकेवर दबाव कायम ठेवला.
चामरी अटापट्टूने सर्वाधिक ३६ धावा केल्या, तर निलाक्षिका सिल्वाने २२ धावांचं योगदान दिलं. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी श्रीलंकेचा संपूर्ण संघ १११ धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून श्री चरणीने चार विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला, तर दीप्ती शर्माने तीन विकेट घेत तिला उत्तम साथ दिली.
२०२४ च्या पराभवाचा घेतला वचपा
आशिया कपच्या इतिहासात भारताचं वर्चस्व राहिलं आहे. अंतिम सामन्यातील या विजयापूर्वी भारताने नऊ फायनलपैकी सात वेळा विजेतेपद मिळवलं होतं. २०१८ मध्ये बांगलादेशने भारताला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं, तर २०२४ मध्ये श्रीलंकेने भारताचं विजेतेपद हुकवलं होतं.
यंदा मात्र अंतिम फेरीत त्याच श्रीलंकेसमोर भारताने दमदार खेळ करत ७२ धावांनी विजय मिळवला आणि मागील पराभवाचा हिशेब चुकता केला.
फायनलपूर्वीही भारताची विजयी घोडदौड
अंतिम सामन्यापर्यंत भारताचा स्पर्धेतील प्रवासही शानदार राहिला. साखळी फेरीत भारताने थायलंडचा ९४ धावांनी, हाँगकाँगचा १३७ धावांनी आणि पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला.
ग्रुप-अमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. फलंदाजीमध्ये शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना, तर गोलंदाजीत दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली.
भारत महिला संघाची प्लेइंग-११
स्मृती मानधना, शेफाली वर्मा, गुणालन कमलिनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा.
श्रीलंका महिला संघाची प्लेइंग-११
चामरी अटापट्टू (कर्णधार), इमेशा दुलानी, विष्मी गुणरत्ने, हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षिका सिल्वा, कौशानी नुथ्यांगना (यष्टीरक्षक), सुगंधिका कुमारी, चामुडी प्रबोधा आणि मिथाली अयोध्या.
0 टिप्पण्या