शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी, अट्टल दुचाकी चोरट्याकडून ११ मोटारसायकली जप्त

 


शिर्डी : परिसरातील वाढत्या मोटारसायकल चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, शिर्डी पोलिसांनी अत्यंत सतर्कता आणि वेगाने तपास करत एका अट्टल दुचाकी चोराला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. विशाल रतन चव्हाण (वय २४, मूळ रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. कालिकानगर, शिर्डी) असे या अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

​शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित विशाल चव्हाण याला ताब्यात घेतले. सुरुवातीला संशयावरून चौकशी केल्यानंतर त्याने अत्यंत चलाखीने केलेल्या मोटारसायकल चोऱ्यांची पोलखोल केली. त्याने केवळ शिर्डीतच नव्हे, तर पैठण, बिडकीन, चाळीसगाव, नगरदेवळा आणि सोयगाव यांसारख्या विविध दूरवरच्या परिसरांमध्ये आपल्या चोऱ्यांचे जाळे पसरवून तिथे या गाड्या लपवून ठेवल्याची माहिती दिली. आरोपीच्या या कबुलीनंतर शिर्डी पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

​तपासामध्ये या चोराचे कनेक्शन शिर्डीपासून थेट चाळीसगाव आणि नेवासापर्यंत पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंतच्या तपासात या ११ पैकी किमान ६ वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल दोन, तर श्रीरामपूर शहर, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि नेवासा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल प्रत्येकी एका अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये चार होंडा शाईन, दोन हिरो स्प्लेंडर प्लस, एक टीव्हीएस स्टार सिटी प्लस आणि तीन बजाज पल्सर मोटारसायकलींचा समावेश असून, यातील दोन गाड्या तर विनानंबर प्लेटच्या आढळून आल्या आहेत. आरोपीच्या या कसून चौकशीमुळे आगामी काळात आणखी काही जुने गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

​ही संपूर्ण धडक कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, प्रदीप बोराडे, महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष लांडे आणि  पोलीस अंमलदार राघव कोतकर यांच्यामार्फत केला जात आहे. शिर्डी पोलिसांच्या या कामगिरीमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या