नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रीय नागरिक पक्षात प्रवेश केलेल्या २० खासदारांपैकी तब्बल १७ खासदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केला आहे. विशेष म्हणजे, दुर्गापूजेपूर्वी म्हणजेच २० ऑक्टोबरच्या आधी हा पक्षप्रवेश होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
या संभाव्य पक्षांतरामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित खासदारांकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
२० खासदारांनी सोडली होती ममता बॅनर्जींची साथ
मे २०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाले आणि पहिल्यांदाच भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. तब्बल १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बाहेर जावे लागले.
सत्तांतरानंतर तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील २९ खासदारांपैकी २० खासदारांनी पक्षाला रामराम केला आणि त्रिपुरातील राष्ट्रीय नागरिक पक्षात प्रवेश केला. आता याच २० खासदारांपैकी १७ जण भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा बसुनिया यांनी केला आहे.
‘भाजपमध्येच जायचं होतं, पण आधी...’
बसुनिया यांनी या पक्षांतरामागील कथित राजकीय गणितावरही भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांची पहिली पसंती भाजपच होती. मात्र, कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी आधी राष्ट्रीय नागरिक पक्षात प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला.
“तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली, तेव्हा त्यांची पहिली पसंती भाजपलाच होती. कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून आधी राष्ट्रीय नागरिक पक्षात प्रवेश करण्यास सांगण्यात आले. मात्र, मनापासून भाजपमध्येच जाण्याची त्यांची इच्छा होती,” असा दावा बसुनिया यांनी केला.
भाजपकडून मात्र बंगालमध्ये स्वबळाचा नारा
दरम्यान, भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी काही दिवसांपूर्वी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. बंगालमध्ये भाजप कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय नागरिक पक्षासोबत युतीची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. “दिल्लीत वेगळी राजकीय समीकरणे असू शकतात. तिथे राष्ट्रीय नागरिक पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. मात्र, दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील अंतर सुमारे १५०० किलोमीटर आहे. बंगालमध्ये आम्ही स्वबळावरच लढणार,” असे भट्टाचार्य यांनी म्हटले.
१७ खासदारांच्या प्रवेशाकडे लक्ष
एकीकडे भाजपकडून बंगालमध्ये स्वबळाची भूमिका मांडली जात असताना दुसरीकडे १७ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो आणि संबंधित खासदार भाजपमध्ये प्रवेश करतात का, याकडे आता पश्चिम बंगालसह राष्ट्रीय राजकारणाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या