मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेता ओंकार भोजने आणि ‘अफरातफरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनला ओंकार उपस्थित राहत नसल्याचा, फोन न उचलण्याचा आणि टीमला सहकार्य न करण्याचा आरोप कवडे यांनी केला होता. ओंकार अनप्रोफेशनल असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता ओंकारने या आरोपांवर आपली बाजू मांडत प्रमोशनच्या नियोजनातील बदलांमुळे काही कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘ऐनवेळी नियोजन बदललं’
प्रमोशनसाठी उपस्थित राहत नसल्याच्या आरोपावर ओंकारने नियोजनातील बदलाकडे लक्ष वेधले. चित्रपटाचे चित्रीकरण अडीच वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असून, आता त्याचे प्रदर्शन होत असल्याचे त्याने सांगितले.
ओंकारच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला २१ सप्टेंबरची तारीख प्रमोशनसाठी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार त्याने आपल्या इतर कामांचे आणि नाटकाच्या दौऱ्यांचे नियोजन केले होते. मात्र, ऐनवेळी २१ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द करून तो २२ सप्टेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आला. त्यामुळे आधीच्या नियोजनामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.
या विषयावर ओंकारने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमातही आपली भूमिका मांडली.
‘पीआरचे फंडे मला कळत नाहीत’
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आपण वेळ देतो; मात्र त्यानंतर दीर्घकाळ प्रमोशनसाठी वेळ देण्याची पद्धत आपल्याला जमत नसल्याचे ओंकारने सांगितले.
“चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी वेळ देतो. पण त्यानंतर एखादी पीआर कंपनी येते आणि १५ दिवस प्रमोशन करायचं असतं, ते मला जमत नाही,” अशी भूमिका त्याने मांडली. चित्रपटासाठी दहा दिवस चित्रीकरण करायचे आणि त्यानंतर आणखी १५ दिवस प्रमोशन करायचे, असे असेल तर त्यासंदर्भातील नियम व अटी सुरुवातीपासूनच स्पष्ट असायला हव्यात, असेही त्याने म्हटले.
प्रमोशनल व्हिडीओ तयार करण्याच्या पद्धतींबाबतही आपल्याला फारशी माहिती नसल्याचे ओंकारने स्पष्ट केले.
‘शूटिंगवेळी फोन बंद ठेवतो’
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबत बोलताना ओंकारने आपली कार्यपद्धतीही सांगितली. शूटिंगच्या वेळी आपण फोन बंद ठेवतो. फोन सुरू ठेवला तर कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत नाही, असे त्याने सांगितले.
कुटुंबासाठीही वेळ द्यायचा असल्याने सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे आपल्या स्वभावात नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र, भविष्यात सोशल मीडियाशी संबंधित गोष्टी शिकण्याचा विचार असल्याचेही ओंकारने सांगितले.
मिलिंद कवडे यांनी काय म्हटलं होतं?
दरम्यान, ओंकार प्रमोशनला उपस्थित राहत नसल्याने आणि त्याच्याशी संपर्क होत नसल्याने मिलिंद कवडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ओंकार फोन उचलत नाही, प्रमोशनच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही आणि कार्यकारी निर्मात्याला सातत्याने खोटी माहिती देतो, असा आरोप त्यांनी केला होता.
प्रमोशनसाठी किमान एक स्वनिर्मित व्हिडीओ पाठवण्याची अपेक्षा असते; मात्र ओंकारने तेही केले नसल्याचे कवडे यांनी म्हटले होते. अभिनेता म्हणून ओंकार उत्तम असला, तरी व्यावसायिक पातळीवर त्याचे वर्तन योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणानंतर भविष्यात ओंकारसोबत पुन्हा काम करणार नसल्याचेही मिलिंद कवडे यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, दिग्दर्शकांच्या आरोपांनंतर ओंकारने आपली बाजू मांडल्याने ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून सुरू झालेला हा वाद आता दोन्ही बाजूंच्या दाव्यांमुळे अधिक चर्चेत आला आहे.
0 टिप्पण्या