महाराष्ट्राच्या दुष्काळाची दिल्लीत दखल; केंद्रीय पथक ३ ऑक्टोबरनंतर राज्यात, शिवराज चौहानही पाहणी करणार




 मुंबई : मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची अखेर केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्राचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक राज्यात पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान हेही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ३ ऑक्टोबरनंतर केंद्रीय पथकाचा महाराष्ट्र दौरा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने प्रशासनाच्या अहवालाच्या आधारे ‘ट्रिगर-१’ परिस्थिती असलेल्या २५६ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या भागातील शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, राज्यातील सुमारे दोन-तृतीयांश भूभागावर दुष्काळाचे सावट असल्याने केंद्राकडूनही परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.

रब्बीसाठी पाण्याचा ताळेबंद महत्त्वाचा

नवी दिल्लीतील पुसा येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलन–रब्बी अभियान २०२६च्या उद्घाटन सत्रात चौहान यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख केला. रब्बी हंगामाचे नियोजन उपलब्ध पाणी, जमिनीतील ओलावा आणि सिंचनाची सुविधा लक्षात घेऊनच करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीटंचाई असलेल्या भागांत कमी पाण्यात येणाऱ्या कडधान्ये आणि तेलबिया पिकांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धान कापणीनंतर रिकाम्या राहणाऱ्या क्षेत्रात हरभरा, मसूर आणि मोहरीची लागवड वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.

बियाणे-खतांचा आधीच आराखडा तयार करा

रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते आणि अन्य कृषी निविष्ठांचा आगाऊ आराखडा तयार ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य वाणाची निवड आणि पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यावरही भर देण्यात आला आहे.

खतांचा संतुलित वापर करण्यासाठी ‘खेत बचाओ’ अभियान रब्बी हंगामातही राबविण्याच्या सूचना चौहान यांनी दिल्या. त्याचबरोबर शेतकरी ओळखपत्र, एग्रीस्टॅक आणि किसान क्रेडिट कार्डचा विस्तार करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महाराष्ट्रासह कर्नाटकातील दुष्काळाचीही पाहणी

रब्बी हंगामातील पेरणीची प्रगती, पिकांची उगवण, रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभाव यांचा साप्ताहिक आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचाही केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत रब्बी हंगामासाठी समन्वित कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

कोकणातील भातशेतीही करपली

दुष्काळाचे सावट केवळ मराठवाडा आणि विदर्भापुरते मर्यादित नसून कोकणातील शेतकऱ्यांनाही पावसाच्या दडीचा मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असताना चिपळूणसह अन्य भागांतील शेतकरीही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

सप्टेंबरअखेरपर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी भातशेती करपली आहे. बियाणे, खत आणि मजुरीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा सरासरीच्या सुमारे ७५ टक्केच पाऊस झाल्याने पुढील काळात पाणीटंचाईची चिंताही वाढली आहे.

चिपळूणसह इतर तालुक्यांचाही दुष्काळी निकषांमध्ये समावेश करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या