‘आम्ही निष्पाप, बदनामी थांबवा’; एमपीएससी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

 


सचिवांशी गैरवर्तनाच्या निषेधार्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पवित्रा; सुरक्षेची हमी मिळेपर्यंत कामकाज थांबविण्याचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या कथित गैरवर्तन आणि धक्काबुक्कीच्या घटनेनंतर आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची भूमिका घेतल्याचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या पत्रानुसार, कार्यालयातून बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याची तसेच मारहाणीची धमकी दिल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कर्तव्य बजावताना सुरक्षिततेची ठोस हमी मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पेपरफुटीच्या कारवाईला पाठिंबा

परीक्षा प्रक्रियेत पेपरफुटी अथवा अन्य गैरप्रकार झाल्यास उमेदवारांमध्ये निर्माण होणारा संताप रास्त असल्याचे कर्मचाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. गैरप्रकारात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

मात्र, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर आयोगातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरसकट दोषी ठरवणे, त्यांच्यावर आरोप करणे अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून चारित्र्यहनन करणे योग्य नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सोशल मीडियावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची किंवा मित्रांची नावे जोडून खोट्या आणि बदनामीकारक माहितीचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

अशा प्रकारे बदनामी करणाऱ्यांविरोधात आयोगाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

‘सुरक्षित वातावरण मिळावे’

सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आयोगाच्या कार्यालयात आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरणात शासकीय कर्तव्य बजावता यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे आंदोलन कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात नसून दोषींवर कारवाई आणि निर्दोष अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आयोगाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची भूमिका घेतल्यास परीक्षा आणि भरती प्रक्रियेशी संबंधित प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये आधीच निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर आता आयोगाचे कामकाज आणि सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रातील दाव्यांबाबत आयोगाकडून अधिकृत स्पष्टीकरण काय येते, याकडे आता उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या