प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कालीन १८व्या शतकाचा ऐतिहासिक अनुभव.अहिल्याबाई होळकरांच्या काळातील वस्तूंच्या अनोख्या प्रदर्शनाने वेधले लक्ष


 झरेकाठी प्रतिनिधी 

पाथरे बु., दि. १७ सप्टेंबर २०२६ :

“१९८० नाही... आम्ही तुम्हाला नेतोय थेट १८व्या शतकात!” या अभिनव संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पाथरे बु. येथे अहिल्याबाई होळकरांच्या काळातील जीवनशैलीचा प्रत्यय देणारे अनोखे ऐतिहासिक वस्तुसंग्रह प्रदर्शन साकारण्यात आले आहे. प्रवरा सांस्कृतिक महोत्सव २०२६ अंतर्गत साकारलेल्या या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अठराव्या शतकातील दैनंदिन जीवन, संस्कृती, परंपरा आणि तत्कालीन जीवनशैलीचा अनुभव देणाऱ्या या प्रदर्शनात चूल, जाते, शिंकाळे, पितळी व तांब्याच्या डेग, तपिले, हांडे, खलिता, मोडी लिपीतील कागदपत्रे तसेच दीपमाळ अशा विविध पारंपरिक वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.

विशेष आकर्षण ठरले आहे ते मोडी लिपीतील कागदपत्रांचे प्रदर्शन. अहिल्याबाई होळकरांच्या काळातील लेखन व प्रशासकीय परंपरेची ओळख करून देणाऱ्या या कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पाठ्यपुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष अनुभवता येत आहे.

चूल, जाते, शिंकाळे आणि पारंपरिक धातूची भांडी यांच्या माध्यमातून तत्कालीन घरगुती जीवनशैली उभी करण्यात आली आहे. तर दीपमाळ आणि धार्मिक साहित्याच्या मांडणीतून त्या काळातील श्रद्धा व संस्कृतीचे दर्शन घडते. “हे राज्य महादेवाचे आहे” या भावनेतून अहिल्याबाईंच्या कार्यातील धर्म, न्याय आणि प्रजाहिताचा विचारही प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना “इतिहास शिकणे नव्हे, तर इतिहास अनुभवणे” हा असून, जुन्या वस्तूंच्या माध्यमातून अठराव्या शतकातील जीवनशैली विद्यार्थ्यांसमोर जिवंत करण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे.

या प्रदर्शनास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील तसेच शिक्षण संचालिका सौ. सरोदे यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. याप्रसंगी सरपंच उमेश घोलप, रमेश पन्हाळे.  आबासाहेब घोलप, बाळकृष्ण चोरमुगे, सुभाष अंत्रे, अशोक घोलप, प्राचार्य डॉक्टर सोपानराव शिंगोटे, प्राचार्य कोंडीबा बारगुजे. डॉ. नवनाथ शिंदे , प्राध्यापिका नूतन जोंधळे, सुवर्णा घोलप, अनिता नळे,प्राध्यापिका वनिता नाईकवाडी,यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते

,प्रदर्शनाची संकल्पना, ऐतिहासिक वस्तूंची केलेली आकर्षक मांडणी आणि विद्यार्थ्यांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

प्रवरा सांस्कृतिक महोत्सव २०२६ हा सन्माननीय नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारला असून, मा. डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्याबाई होळकरांच्या काळातील वस्तूंच्या या आगळ्यावेगळ्या मांडणीमुळे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे हे प्रदर्शन महोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या