१७ वर्षे रखडला मुंबई-गोवा महामार्ग; खर्चात तब्बल ५,५०० कोटींची वाढ, गडकरींच्या नाराजीने प्रकल्प पुन्हा चर्चेत

 


मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प गेल्या १७ वर्षांपासून रखडलेला असतानाच त्याच्या खर्चात तब्बल ५,५०० कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३५५ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला मूळ खर्च ११,४०९.१४ कोटी रुपये होता. आता हा खर्च १६,९०९.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या खर्चात सुमारे ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’चे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

मंजुरीला १७ वर्षे; काम अद्याप अपूर्ण

मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी देऊन तब्बल १७ वर्षे उलटली आहेत. मात्र, या कालावधीनंतरही महामार्गाचा मोठा भाग पूर्णत्वास गेलेला नाही.

या प्रकल्पाचे दहा पॅकेज करण्यात आले असून, त्यापैकी काही पॅकेजच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट ते आरावली या पॅकेजच्या खर्चात सर्वाधिक वाढ झाल्याची माहिती आहे. या पॅकेजसाठी सुरुवातीला ९८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

कशेडी बोगद्यातही सुरक्षेचा प्रश्न

दरम्यान, कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात आलेल्या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोगद्यातील प्रकाशयोजना आणि वायुविजन व्यवस्था वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

वीजपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे काही वेळा बोगद्यातील दिवे आणि वायुविजन यंत्रणा बंद पडते. परिणामी, वाहनचालकांना केवळ वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशावर अवलंबून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. बोगद्यात छतावरून पाणी झिरपल्याने रस्ता ओलसर होण्याच्या घटनाही समोर येत आहेत.

पर्यायी वीजव्यवस्थेवरही प्रश्न

महावितरणचा नियमित वीजपुरवठा सुरू होण्यापूर्वी बोगद्यासाठी पर्यायी विद्युत व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र, या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने प्रकाशयोजना आणि वायुविजन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत.

बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातील अनेक पथदिवेही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्घाटनालाच गडकरींची नाराजी?

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला झालेला विलंब आणि त्यासाठी वाढत गेलेला खर्च यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचे काम अपेक्षित वेळेत पूर्ण न झाल्याने त्यांनी उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.

दरम्यान, गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईच्या दिशेने परतीच्या वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कशेडी बोगद्यातील प्रकाशयोजना, वायुविजन आणि विद्युत व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

१७ वर्षांचा विलंब, हजारो कोटींची वाढलेली किंमत आणि अद्यापही कायम असलेल्या मूलभूत सुविधांच्या समस्या यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचा प्रकल्प पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या