शहरातील पद्मानगर परिसरात शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (६५) यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बहिणीने आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही
संजीव सोनवणे हे पद्मानगर परिसरातील मोठ्या बंगल्यात एकटे राहत होते. त्यांची पत्नी सुचेता, मुलगा दिग्विजय, मुलगी क्षमा आणि जावई अमेरिकेत वास्तव्यास आहेत.
सोमवारी रात्री सोनवणे घरी एकटे होते. मंगळवारी सकाळी त्यांची बहीण त्यांना भेटण्यासाठी घरी आली. घराचे गेट उघडल्यानंतर तिने आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेली असता सोनवणे मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे परवानाधारक शस्त्रासह एक कथित सुसाईड नोटही आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती अमेरिकेत असलेल्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
सुसाईड नोटची पोलिसांकडून पडताळणी
सुसाईड नोटमध्ये कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला घटनेसाठी जबाबदार धरू नये आणि कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा आशयाचा मजकूर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नोटमध्ये नमूद असलेल्या काही शब्दांवरून तपास यंत्रणा अधिक माहिती घेत आहे.
नातेवाइकांनी नोटमधील हस्ताक्षर सोनवणे यांचेच असल्याचे सांगितले असले तरी पोलिसांनी अद्याप त्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीने त्याची पडताळणी केली जात आहे. तसेच घटनेमागील नेमके कारण काय होते, याचाही तपास सुरू आहे.
कुटुंबीय विदेशात; अंत्यविधी गुरुवारी
सोनवणे यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई अमेरिकेत आहेत. त्यांचा भाऊ मुंबईत, तर तीन बहिणी पुण्यात राहतात. विदेशातील कुटुंबीयांना लातूरला पोहोचण्यासाठी वेळ लागणार असल्याने अंत्यविधी गुरुवारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोनवणे यांच्या वैयक्तिक आयुष्यात नैराश्य किंवा मानसिक तणाव होता का, याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही.
शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान
संजीव सोनवणे हे डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक होते. मूळचे औसा तालुक्यातील मोगरगा येथील असलेल्या सोनवणे यांच्या कुटुंबाची शिक्षण क्षेत्रात पार्श्वभूमी आहे.
त्यांचे वडील डॉ. चंद्रभानू सोनवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या स्मरणार्थ लातूर शहरात कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. तसेच धाराशिव तालुक्यातील उक्कडगाव येथेही त्यांनी महाविद्यालय सुरू केले होते.
संजीव सोनवणे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सुसाईड नोट, घटनास्थळावरील पुरावे आणि अन्य बाबींची पडताळणी केली जात आहे.
0 टिप्पण्या