मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष पोस्ट करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. सध्याच्या सामाजिक वातावरणावर भाष्य करताना त्यांनी अंधश्रद्धा, उत्सवांमधील वाढता गोंगाट आणि राजकीय स्वार्थासाठी घेतल्या जाणाऱ्या भूमिकांवर टीका केली.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, समाज अधिकाधिक उत्सवप्रिय आणि गोंगाटप्रिय होत असताना धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धांना श्रद्धेचे स्वरूप दिले जात आहे. अशा प्रथांवर तार्किक प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना लगेच हिंदूविरोधी ठरवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘राजकारण्यांनी समाजाला थांबवायला हवं’
समाज कुप्रथा किंवा चुकीच्या प्रवाहात वाहून जात असेल, तर राजकारण्यांनी समाजाला थांबवण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मात्र, सध्याच्या राजकारणात याच्या उलट चित्र दिसत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
“स्वतःच्या मतांच्या लाचारीसाठी संधी दिसेल तिकडे झुकायला राजकारणी तयार होत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. आज प्रबोधनकार ठाकरे हयात असते, तर त्यांनी या परिस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून कठोरपणे भाष्य केले असते, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
‘तर्काने विचार करण्याची शक्ती कायम राहावी’
महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांनी प्रबोधनाची दिशा दाखवली आणि त्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्राची वाटचाल झाली, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
महाराष्ट्राकडे कोणत्याही विषयाकडे तर्काच्या कसोटीवर पाहण्याची जी शक्ती आहे, ती कायम राहावी आणि अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हीच प्रबोधनकार ठाकरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले.
कोण होते प्रबोधनकार ठाकरे?
केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्रातील समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करताना त्यांनी अनेक रूढी आणि सामाजिक कुप्रथांविरोधात लिखाण केले.
प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल येथे झाला. सामाजिक परिवर्तन आणि समाजप्रबोधन हे त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्र होते. ते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि राज ठाकरे यांचे आजोबा होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण पनवेल येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते देवास येथे गेले आणि मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, वडिलांची नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेली दीड रुपयांची फीही ते भरू शकले नाहीत. त्यामुळे वकील होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.
प्रबोधनकारांनी पुढे लेखन, पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर ठसा उमटवला. त्यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टमधून तर्कनिष्ठ विचार, सामाजिक सुधारणांची गरज आणि राजकीय नेतृत्वाची सामाजिक जबाबदारी हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत.
0 टिप्पण्या