अकोला : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अमरावती विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. विभागातील विविध पक्षांचे खासदार आणि आमदारही बैठकीला उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी दुष्काळावर बोलत असताना अधिकारी मोबाईलमध्ये
दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागासमोर निर्माण झालेल्या अडचणींबाबत लोकप्रतिनिधी बैठकीत पोटतिडकीने भूमिका मांडत होते. त्याचवेळी काही अधिकारी मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सॲपसह अन्य बाबी पाहण्यात व्यस्त असल्याचे समोर आले.
दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कृषीमंत्र्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. मात्र, त्याच बैठकीत काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने प्रशासन या विषयाकडे किती गांभीर्याने पाहत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत ‘काजू-बदाम’च्या चर्चेवरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच अकोल्यातील हा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा टीका होत आहे.
‘संवेदना हरवल्याचे दिसून आले’
काँग्रेस आमदार अमित झनक यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या बैठकीत कृषीमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित असताना अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असणे निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.
“प्रशासनाची दोन चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी. दुष्काळावर मात करण्यासाठी दोघांनीही जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने काम करणे अपेक्षित आहे. मात्र, कृषीमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित असलेल्या बैठकीत असे प्रकार घडत असतील, तर हा गंभीर विषय आहे. सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे आणि अशा वेळी प्रशासनातील काही घटकांची संवेदनशीलता हरवल्याचे दिसून येत आहे,” अशी टीका झनक यांनी केली.
कृषीमंत्र्यांकडून चौकशीचे संकेत
दरम्यान, बैठकीत मोबाईल पाहण्यात व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रकाराची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून बैठकीच्या गांभीर्याचा भंग झाला, याची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा असताना बैठकीतील या प्रकारामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
0 टिप्पण्या