मोदींच्या मिमिक्रीवर प्रफुल्ल पटेलांचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, ‘देश वाढवायचा की आखाडा चालवायचा?’


 मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीचा मुद्दा राजकीय चर्चेत आला आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. मिमिक्री करून नेमके काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इंदूरमध्ये आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण व्यवस्था, रोजगार, पेपरफुटी आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याची आणि हावभावांची नक्कल केली. राहुल गांधी मंचावर उपस्थित असतानाच हे सादरीकरण करण्यात आले.

‘मिमिक्री करणं सोपं, पण यातून साध्य काय?’

या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल यांनी थेट राहुल गांधींना लक्ष्य केले.

“कालचा इंदूरचा कार्यक्रम हा बालिशपणाचा कार्यक्रम होता. मिमिक्री करणं सोपं आहे; पण यामधून काय साध्य होणार आहे? आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की आखाडा चालवण्यासाठी?” असा सवाल पटेल यांनी केला.

दुष्काळी परिस्थितीवर सरकार लक्ष देत असल्याचा दावा

महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबतही प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले. राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार परिस्थितीची गंभीर दखल घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

यूपीआय शुल्कावर केंद्र सरकारने विचार करण्याची मागणी

दरम्यान, यूपीआय व्यवहारांवरील सुधारित एमडीआर शुल्कावरून पेट्रोल पंप चालकांनी घेतलेल्या भूमिकेवरही पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. १५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय व्यवहार स्वीकारणार नसल्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.

यूपीआयवरील एमडीआरबाबत केंद्रातील संसदीय स्तरावर यापूर्वी चर्चा झाली होती. त्यावेळी या मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला नव्हता, असे पटेल यांनी सांगितले. मात्र, आता या शुल्कामुळे काही घटकांना अडचणी येत असतील तर केंद्र सरकारने त्याचा पुनर्विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यूपीआयमुळे डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली असून सामान्य नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही पटेल यांनी नमूद केले. गरज भासल्यास केंद्र सरकार शुल्करचनेत सुधारणा करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या