दुष्काळ जाहीर करण्याची गरज; परिस्थितीनुसार निर्णय होईल : कृषिमंत्री भरणे

 


पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना “दुष्काळ जाहीर करणे ही आजची गरज आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तो आपोआप जाहीर होईल,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. कृषी आणि महसूल विभागाकडून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली जाणार असून, शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरापासून राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याची मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे भरणे यांनी सांगितले.

“मी स्वतः पाच ते सहा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार आहे. प्रत्यक्ष माहिती घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असे भरणे यांनी स्पष्ट केले.

चारा छावण्यांबाबतही निर्णयाची शक्यता

पावसाअभावी पशुधन आणि दुग्ध व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज भासल्यास चारा छावण्यांबाबत विचार केला जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. पशुधन आणि दुग्ध व्यवसायासंदर्भातील पुढील निर्णय दिवाळीच्या आसपास घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र

दरम्यान, शेतीच्या सातबाऱ्यावर नाव नसलेल्या महिलांनाही शेतकरी म्हणून शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांना या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या प्रमाणपत्राच्या आधारे महिला शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे भरणे यांनी सांगितले.

५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन असल्याची माहितीही कृषिमंत्र्यांनी दिली. या योजनेसाठी अंदाजे ४० हजार ८८५ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याची प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, याबाबत शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

लातूरमध्ये दुष्काळाच्या मागणीसाठी रास्तारोको

दरम्यान, पावसाअभावी लातूरसह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, पीकविमा योजनेतून वगळण्यात आलेल्या नुकसानीच्या बाबी पुन्हा समाविष्ट कराव्यात आणि गावनिहाय पीक कापणी प्रयोग घ्यावेत, अशा मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

एकीकडे सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेण्याचे संकेत दिले जात असताना दुसरीकडे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटनांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची स्थिती आणि खरीप पिकांचे नुकसान याकडे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या