कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर थेट निशाणा साधत, काही संस्थांची संख्या कमी करून आपली राजकीय ताकद आणि ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे.
गोकुळमधील संस्थांच्या पात्रता आणि सदस्यसंख्येच्या मुद्द्यावरून महायुतीतील घटकांमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “आमच्या संस्था कशा कमी होतील आणि आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल, यासाठी प्रयत्न झाले. मात्र आमच्या सदस्यांची संख्या कशी कायम राहील, यासाठी आम्ही प्रयत्न केले.”
या प्रक्रियेमुळे काही संस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली असेल, तर ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मात्र, या मतभेदांचा महायुतीच्या एकजुटीवर परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार?
गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मुश्रीफ यांनी फेटाळून लावली. नेत्यांकडून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
“महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल आणि महायुतीच विजयी होईल,” असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अद्याप बैठक झालेली नसून, ७ ऑक्टोबरपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गोकुळच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपात्र संस्थांच्या मुद्द्यावरही मुश्रीफांची भूमिका
गोकुळमधील काही संस्थांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयावरही मुश्रीफ यांनी भाष्य केले. अपात्र ठरवण्यात आलेल्या संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित संस्थांचे प्रमाण अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसशी संबंधित काही संस्थाही या प्रक्रियेत आल्याचे सांगत, या संस्था वाचवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागल्याचे मुश्रीफ म्हणाले.
पदवीधर मतदारसंघावरूनही महायुतीत रस्सीखेच
दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरूनही महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. मागील काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला.
भैय्या माने यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम चांगले असल्याचे सांगत राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपकडून मागितली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीचीही चर्चा असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.
‘एक-एक जागा वाटून घेतल्यास दोन्ही जागा जिंकू’
मंगेश चिवटे यांची समजूत काढण्यात यश आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने प्रत्येकी एक जागा लढवली, तर दोन्ही जागांवर महायुतीचा विजय होऊ शकतो, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गोकुळच्या निवडणुकीपासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागावाटपापर्यंत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या