‘हनुमान अंश’ने जिंकले सेहवागचे मन; भावुक होत शेअर केला खास अनुभव
मुंबई : संत नीम करोली बाबा यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानेही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. चित्रपटातील एका प्रसंगाने सेहवाग इतका प्रभावित झाला की, त्याने सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
व्हिडिओची सुरुवात “सीता-राम” या शब्दांनी करत सेहवागने बाबा नीम करोली यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी असलेले आपले आकर्षण सांगितले. सुमारे दहा वर्षांपूर्वी एका मित्राकडून त्यांना बाबा नीम करोली यांच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आणि श्रद्धा अधिकाधिक वाढत गेल्याचे सेहवागने सांगितले.
चित्रपटातील एका विशेष दृश्याचा उल्लेख करताना तो म्हणाला की, या प्रसंगाने त्याच्या मनाला अक्षरशः स्पर्श केला. दृश्यात बाबा नीम करोली यांच्या गळ्यात साप असतात. त्यावेळी एक भक्त त्यांना, “तुम्ही तर महादेवासारखे भोलेनाथ आहात,” असे म्हणतो. त्यावर महाराजजी उत्तर देतात, “भोळे तर तुम्ही आहात. डोळ्यांना तेच दिसते जे मनात असते आणि मन तेच दाखवते जे हृदयात असते.”
हा विचार अत्यंत गहन असून, अशा शब्दांतूनच एका महान संताची जीवनदृष्टी प्रकट होते, अशा भावना सेहवागने व्यक्त केल्या.
बाबा नीम करोली यांच्या निधनाला पाच दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी आजही त्यांच्या भक्तांच्या जीवनात त्यांच्या कृपेचा अनुभव येतो, ही अत्यंत अद्भुत बाब असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यांच्या विशाल आणि अथांग जीवनप्रवासाला एका चित्रपटात पूर्णपणे मांडणे शक्य नसले, तरी ‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांनी अत्यंत संवेदनशील आणि अर्थपूर्ण पद्धतीने ही कथा रुपेरी पडद्यावर साकारली आहे, असे मत सेहवागने नोंदवले.
महाराजजींना ओळखणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि ज्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती नाही, त्यांनीही संत नीम करोली बाबा यांच्या जीवनाची झलक अनुभवण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन सेहवागने चाहत्यांना केले.
विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाला प्रदर्शनाच्या सुरुवातीला अपेक्षेइतका वेगवान प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि वाढत्या चर्चेमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार मुसंडी मारली असून कोट्यवधींची कमाई करत तो यशस्वी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवत आहे.
0 टिप्पण्या