एकेकाळी जगभरातील तंत्रज्ञानाच्या बाजारावर एकछत्री अंमल गाजवणारे नोकिया, आयबीएम, ब्लॅकबेरी आणि एरिक्सनसारखे ब्रँड्स आज अचानक पुन्हा चर्चेत आले आहेत. कदाचित आश्चर्याचा धक्काच बसेल. नोकियाने मोबाइल फोनचे उत्पादन सोडून दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे मोर्चा वळवला आहे. आयबीएमने पीसी व्यवसायातून बाहेर पडून हायब्रिड क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला, तर ब्लॅकबेरीने स्मार्टफोनचा व्यवसाय बंद करून कारमधील क्यूएनएक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे केवळ त्यांचे ‘कमबॅक’ नाही; तर तंत्रज्ञानाच्या सतत बदलत्या बाजारात टिकून राहण्यासाठी व्यवसायाचे स्वरूपच बदलणाऱ्या कंपन्यांची ही यशोगाथा आहे.
भूतकाळात भविष्याची बीजे शोधण्याचा प्रयत्न
‘नोकिया’ म्हणजे मोबाइल फोन, ‘ब्लॅकबेरी’ म्हटले की, की-बोर्ड असलेला स्मार्टफोन, ‘आयबीएम’ म्हटले की पर्सनल कॉम्प्युटर अर्थात पीसी आणि ‘एरिक्सन’ म्हटले की, मोबाइल फोन असा या ब्रँडस् चा परिचय होता. मात्र तंत्रज्ञान क्षेत्रात लोकप्रियता ही कायमस्वरूपी राहात नाही. एखादे उत्पादन बाजारात यशस्वी झाले म्हणून त्याचा व्यवसाय कायम राहीलच असे नसते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल झपाट्याने होतात आणि त्याच्याशी जुळवून न घेणाऱ्या व्यक्तीच काय तर कंपन्याही अस्तंगत होतात. महत्त्वाचे म्हणजे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तत्कालीन आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या जुन्या व्यवसायामधील लहानसहान गोष्टींमध्ये भविष्यातील व्यवसायाची बीजे शोधण्याचा प्रयत्न केला आणि आज कंपन्या त्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
ब्लॅकबेरी : स्मार्टफोन गेला, सुरक्षाप्रणाली टिकली
ब्लॅकबेरीचे उदाहरण सर्वाधिक नाट्यमय आहे. मोबाइलला असलेला QWERTY की-बोर्ड, सुरक्षित ई-मेल आणि मेसेजिंग यामुळे २०००च्या दशकात ब्लॅकबेरी हा स्मार्टफोन जगातील सर्वात प्रभावशाली ब्रॅण्ड होता. मात्र टचस्क्रीन, अॅप-आधारित स्मार्टफोन आणि विशेषतः आयफोन तसेच अँड्रॉइडच्या उदयानंतर ब्लॅकबेरीचा पारंपरिक व्यवसाय पूर्णतः कोसळला. कंपनीने २०१६ मध्ये स्वतःचे फोन उत्पादन बंद केले. आणि आपले लक्ष हार्डवेअरऐवजी सॉफ्टवेअरकडे वळवले. आज ब्लॅकबेरीच्या व्यवसायातील महत्त्वाचा भाग QNX या एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिमशी संबंधित आहे. मोटारी, औद्योगिक उपकरणे आणि इतर महत्त्वाच्या प्रणालींमध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जाते.
सुरक्षाप्रणालीची नवी बाजारपेठ
ग्राहकांच्या हातात दिसणारे उत्पादन संपले तरी त्या उत्पादनासाठी विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर किंवा बौद्धिक संपदा संपत नाही. सुरक्षाभिंत भेदू न शकणारी प्रणाली हा ब्लॅकबेरीचा कणा होता. त्याचाच वापर त्यांनी नवीन उत्पादनांमध्ये केला, ब्लॅकबेरीने त्यांच्या अदृश्य संपत्तीचे नव्या बाजारपेठेत रूपांतर केले. २०२६ मध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून आली असून, अनेक वर्षांनंतर कंपनीच्य महसुलामध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळते आहे.
नोकिया : मोबाइल फोन ते एआयच्या पायाभूत सुविधांपर्यंत
नोकियाची कहाणी आणखी वेगळी आहे. एकेकाळी जगातील सर्वाधिक मोबाइल फोन विकणारी कंपनी म्हणून नोकियाचे नाव घेतले जात होते. परंतु स्मार्टफोनच्या संक्रमणात कंपनीला अॅपल आणि अँड्रॉइड परिसंस्थेच्या वेगाशी जुळवून घेता आले नाही. अखेर २०१४ मध्ये नोकियाने आपला मोबाइल फोनचा व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकला. त्यानंतर नोकियाने आपली ओळखच बदलली आणि नेटवर्क पायाभूत सुविधा पुरविण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. अल्काटेल-ल्युसेंटचे अधिग्रहण आणि नंतर ऑप्टिकल नेटवर्किंग क्षेत्रातील Infineraचे अधिग्रहण या माध्यमातून नोकियाने नेटवर्क व्यवसाय अधिक मजबूत केला. आज नोकियाच्या उत्पादनांचा संबंध ग्राहकांच्या हातातील फोनपेक्षा त्या फोनला जोडणाऱ्या नेटवर्कशी अधिक आहे. आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेने नोकियाला आणखी एक संधी दिली आहे.
नोकियाचा एआय नेटवर्कमध्ये प्रवेश
एआय मॉडेल्ससाठी उभारल्या जाणाऱ्या डेटा सेंटरमध्ये प्रचंड प्रमाणावर संगणकीय शक्तीची गरज असते. हजारो GPU एकमेकांशी जोडण्यासाठी अत्यंत वेगवान नेटवर्क आणि ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी आवश्यक असते. म्हणजेच एआयची वाढ केवळ चिप उत्पादकांसाठी संधी नाही; त्या चिप्सना जोडणाऱ्या नेटवर्कसाठीही ती मोठी बाजारपेठ आहे. नोकियाच्या २०२६च्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, एआय आणि क्लाउड उत्पादनांच्या विक्रीत वर्षभरात ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ऑप्टिकल नेटवर्क्सच्या व्यवसायात २० टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत एआय आणि क्लाउड उत्पादनांच्या विक्रीत तब्बल १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोबाइल फोनपासून सुरू झालेल्या व्यवसायाचा नोकियाचा प्रवास आता एआयच्या मागे उभ्या असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे.
आयबीएम : पीसी ते एआय आणि हायब्रिड क्लाउड
आयबीएमचे व्यवसायातील परिवर्तन हे अधिक नियोजित स्वरूपाचे होते. १९८१ मध्ये IBM Personal Computer बाजारात आला आणि तो पीसीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. मात्र कालांतराने वैयक्तिक संगणक हा तुलनेने कमी नफा देणारा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येणारा व्यवसाय ठरला. तेव्हा आयबीएमने पीसी व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये कंपनीच्या पर्सनल कॉम्प्युटिंग डिविजनची विक्री लिनोवाला करण्यात आली. आणि आयबीएनने एंटरप्राइज सॉफ्टवेअर, सेवा, क्लाउड आणि उच्च क्षमतेच्या संगणकीय सेवांवर भर दिला.
हायब्रिड क्लाउड ठरली नव्या व्यवसायाची मध्यवर्ती संकल्पना
२०१९ मध्ये Red Hat ही बडी कंपनी ३४ अब्ज डॉलरला विकत घेतली आणि हायब्रिड क्लाउड ही आयबीएमच्या नव्या व्यवसायाची मध्यवर्ती संकल्पना ठरली. आता त्यात एआयची भर पडली आहे. २०२६च्या दुसऱ्या तिमाहीत IBMच्या Red Hatशी संबंधित Hybrid Cloud महसुलात ११ टक्के वाढ झाली. डिस्ट्रिब्युटेड इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायात तब्बल ३७ टक्के वाढ झाली. कधीकाळी घराघरातील पीसीशी जोडली कंपनी आता डेटा, क्लाउड, एआय आणि संगणकीय पायाभूत सुविधांच्या बाजारपेठेच स्थिरावली आहे.
0 टिप्पण्या