देशातील लाखो तरुणांसाठी UPSC परीक्षा उत्तीर्ण होणं हे एका स्वप्नासारखं असतं. अनेक वर्षांची खडतर मेहनत, वारंवार केलेले प्रयत्न आणि त्याग यासाठी करावा लागतो. मात्र, एकदा हे ध्येय साध्य झाल्यावर आणि लाल दिव्याची गाडी मिळाल्यानंतर पुढे काय? याच प्रश्नाचं उत्तर २०१३ च्या तुकडीतील रोमन सैनी आणि दिव्या मित्तल या दोन सनदी अधिकाऱ्यांनी अत्यंत रंजक पद्धतीने दिलं आहे.
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी IAS झालेल्या रोमन सैनी यांनी केवळ २० महिन्यांत प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ‘अनअकॅडमी’सारखे देशातील अग्रगण्य एडटेक साम्राज्य उभारलं. आता एक दशकाहून अधिक काळानंतर अपग्रॅडनं (upGrad) अनअकॅडमीचं अधिग्रहण केलं. सैनी यांच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण झाला.
दुसरीकडं तब्बल १३ वर्षे विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पद सांभाळणाऱ्या IAS दिव्या मित्तल यांनीही काही दिवसांपूर्वी प्रशासकीय सेवेचा अचानक राजीनामा दिला. दोघांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या, तरी १३ वर्षांनंतर या दोघांचा प्रवास पुन्हा एका अनोख्या वळणावर येऊन ठेपला आहे. या दोघांनी घेतलेल्या निर्णयाचा आढावा इंडिया टुडेच्या वृत्तात घेण्यात आला आहे.
कारकीर्द सुरू होताच रोमन सैनी यांनी सोडली नागरी सेवा
रोमन सैनी यांचा निर्णय त्यावेळी प्रशासकीय वर्तुळात प्रचंड धक्कादायक मानला गेला होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी ‘एम्स’ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत देशात १८ वा क्रमांक पटकावला. वयाच्या २२ व्या वर्षी कोट्यवधी तरुणांचे स्वप्न असणारं पद त्यांनी मिळवलं.
मात्र, त्यांचं प्रशासनातील वास्तव्य दोन वर्षांहून कमी काळ टिकू शकलं. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत (LBSNAA) प्रशिक्षणादरम्यान गौरव मुंजाल यांच्याशी झालेल्या एका संवादाने त्यांचे विचार बदललं. त्यांनी थेट सनदी सेवेला रामराम ठोकून ऑनलाइन शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ‘अनअकॅडमी’ची सुरुवात केली.
त्या निर्णयाची आठवण काढताना सैनी यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “आज ‘अपग्रॅड’ अनअकॅडमीचे अधिग्रहण करत आहे. लबासना (LBSNAA) मध्ये फिरताना आयएएस सोडून स्वतःची कंपनी सुरू करण्याचा तो निर्णय आणि तिथपासूनचा आजवरचा प्रवास थक्क करणारा राहिला आहे.” सुमारे १,६०० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या या करारानंतर, यूपीएससी क्रॅक केल्याच्या बरोबर १३ वर्षांनी रोमन सैनी पुन्हा एकदा कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावर पोहोचलं आहेत.
१३ वर्षांनंतर दिव्या मित्तल यांचा राजीनामा
रोमन सैनी यांच्यापेक्षा दिव्या मित्तल यांचा मार्ग अगदी उलट होता. आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरूमधून शिक्षण पूर्ण करून त्यांनी लंडनमध्ये काही काळ नोकरी केली. त्यानंतर देशात परतून त्यांनी २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तर प्रदेश केडर मिळालेल्या मित्तल यांनी देवरिया, मिर्झापूर आणि संत कबीर नगर यांसारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केलं. मिर्झापूरमधील एका दुर्गम डोंगराळ गावात अनेक दशकांनंतर नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे श्रेय त्यांना दिले जातं.
सामान्य प्रशासकीय अधिकाऱ्याच्या चौकटीपलीकडे जात लोकाभिमुख काम करणाऱ्या मित्तल यांनी ३० ऑगस्ट रोजी अचानक सेवेचा राजीनामा दिला. आपल्या १३ वर्षांच्या प्रवासाला “अविस्मरणीय” असे संबोधत त्यांनी प्रशासनाचा निरोप घेतला, मात्र राजीनाम्यामागील नेमकं कारण त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
यशस्वी कारकिर्दीची नवी व्याख्या
रोमन सैनी यांनी आयएएस झाल्यानंतर अवघ्या २० महिन्यांत नोकरी सोडून उद्योजकतेची वाट धरली; तर दिव्या मित्तल यांनी १३ वर्षे प्रशासनात राहून लोकांची सेवा केली आणि त्यानंतर सेवेचा निरोप घेतला. या दोघांच्या निर्णयांनी यूपीएससीच्या तयारीला लागलेल्या तरुणांसमोर एक नवा विचार मांडला आहे.
एखादं पद अथवा यश मिळवणं म्हणजे आयुष्यभरासाठी एकाच साच्यात अडकून राहणं नव्हे, तर सर्वोच्च शिखर गाठल्यानंतरही माणसाला स्वतःच्या आवडीनुसार नवे मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य असतं, हेच या दोघांच्या १३ वर्षांच्या प्रवासातून अधोरेखित होतं.
0 टिप्पण्या