महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांशी संबंधित मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट देत सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा केला असेल, तर विद्यार्थी अद्याप आंदोलनस्थळी का बसले आहेत, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनस्थळी राऊत यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारासह सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
‘सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असतील, तर विद्यार्थी अजूनही आंदोलन का करत आहेत?’ असा सवाल करत राऊत यांनी सरकारने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात, असे म्हटले. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने आंदोलकांशी चर्चा करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘प्रशासनाची एक पिढी बरबाद होण्याचा धोका’
महाराष्ट्राच्या प्रशासनाचा महत्त्वाचा आधार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड होणारे अधिकारी आहेत. त्यामुळे परीक्षांमधील कथित गैरप्रकारांचा थेट परिणाम राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर होऊ शकतो, असा दावा राऊत यांनी केला.
“प्रशासनात निर्माण होणाऱ्या एका पिढीला बरबाद करण्याचे काम तुम्ही करत आहात. हे पाप कुठे फेडाल?” असा सवाल त्यांनी सरकारला केला.
निवडणूक प्रक्रियेवरही राऊत यांनी टीका केली. केंद्र सरकारकडून निवडणुका पारदर्शकपणे घेता येत नसतील, तर स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकार निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार आणि गैरप्रकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘परीक्षांमधील गैरप्रकार गंभीर’
परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटना घडत असल्याचा आरोप करत राऊत यांनी नोकरभरतीच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या समर्थकांना व्यवस्थेत स्थान देऊन संपूर्ण राज्यव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तरुणांना शिक्षण, विचार आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीपासून दूर नेऊन त्यांना एका विशिष्ट विचारसरणीचे अनुयायी बनवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा दावाही राऊत यांनी केला.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही आणि आंदोलन पुन्हा जिल्ह्या-जिल्ह्यांत उभे राहिले, तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही राऊत यांनी दिला. “पुन्हा प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभे राहिले, तर सरकारची गाडी मंत्रालयाबाहेर पडणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, आयोगाच्या कारभारात वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी असल्याचे राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने ठोस भूमिका घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या