दुष्काळी परिस्थिती, उत्पादन खर्चातील वाढ आणि साखर उद्योगातील आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास ऊसतोड रोखण्यासह साखर कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. जयसिंगपूर येथे झालेल्या संघटनेच्या २५ व्या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बारा ठराव मंजूर करण्यात आले.
यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल प्रतिटन ४ हजार ५०० रुपये, त्यानंतर ५०० रुपये आणि केंद्र सरकारकडून ५०० रुपये अनुदान, अशा एकूण ५ हजार ५०० रुपयांची मागणी शेट्टी यांनी केली. साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ५० रुपये करावा, तर इथेनॉलचा दर प्रतिलिटर ५७.९७ रुपयांवरून ७० रुपये करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी १५ नोव्हेंबरपूर्वी राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
केंद्र सरकारशी चर्चा; महामार्ग रोखण्याचा इशारा
उसाच्या दरासह साखर उद्योगाच्या प्रश्नांवर १२ ऑक्टोबरला केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चेत तोडगा न निघाल्यास १३ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येतील, असे शेट्टी यांनी जाहीर केले. कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलन करण्यासह महामार्ग आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला.
केंद्र सरकार साखर कारखानदारांवर हंगाम सुरू करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करताना, अशा परिस्थितीत कारखानदार आणि शेतकरी दोघांचेही नुकसान होऊ शकते, असे शेट्टी म्हणाले. त्यामुळे कारखानदारांनी सरकारी दबावापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत
ऊस परिषदेत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची मदत देण्याची मागणी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वाढवून एक लाख रुपये करावे, असाही ठराव मंजूर करण्यात आला.
शेतीपंपांचे १५ अश्वशक्तीपर्यंतचे वीजबिल माफ करावे आणि सहकारी उपसा सिंचन योजनांचाही या निर्णयात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. डोंगराळ भागातील तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील पंपांऐवजी नियमित कृषी वीजजोडण्या उपलब्ध करून देण्याची मागणीही परिषदेत करण्यात आली.
कोयनेचे पाणी शेती आणि पिण्यासाठी राखून ठेवण्याची मागणी
कृष्णा खोऱ्यातील सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे परिषदेत नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे ६७.५ टीएमसी पाणी शेती आणि पिण्यासाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
साखर उद्योगासाठी स्वस्त कर्ज आणि व्याजसवलत
इथेनॉल उत्पादनातील घट आणि प्रकल्पांवरील कर्जाचा वाढता भार लक्षात घेता साखर कारखान्यांना वर्षभरासाठी व्याजसवलत आणि कर्जफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना नाबार्ड, साखर विकास निधी किंवा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून वार्षिक चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा ठरावही मंजूर झाला.
वजनकाट्यांवर नियंत्रण, साखरेच्या पोत्यांना बारकोड
साखर कारखान्यांमध्ये वजनकाट्यांतील अनियमितता आणि साखर उत्पादनातील गैरव्यवहार रोखण्यासाठी सर्व वजनकाटे डिजिटल करून ऑनलाइन करावेत, अशी मागणी संघटनेने केली. गळीत हंगाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दैनंदिन साखर उत्पादन आणि विक्रीवर देखरेख ठेवण्यासाठी महसूल, पुरवठा, वजनमापे विभाग आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करावी. प्रत्येक साखरेच्या पोत्यावर बारकोड बंधनकारक करावा, असाही ठराव आहे.
वाहतूक अंतरानुसार दर निश्चित करा
दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट आणि कारखान्यांच्या गाळप क्षमतेतील वाढ यामुळे काही ठिकाणी ५० ते ७० किलोमीटर अंतरावरून ऊस आणावा लागत असल्याचा मुद्दा परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ऊसतोडणी आणि वाहतुकीचे दर १ ते २५, २५ ते ५० आणि ५० ते १०० किलोमीटर अशा अंतरानुसार स्वतंत्रपणे निश्चित करावेत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे आणि १५ डिसेंबरनंतर तुटणाऱ्या उसाला ठरलेल्या दराव्यतिरिक्त प्रतिटन ३०० रुपये जादा द्यावेत, असेही ठरावात नमूद आहे. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ऊस परिषदेने पाठिंबा दिला.
दराचा प्रश्न ऐरणीवर
यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये मिळावेत, ही ऊस परिषदेची प्रमुख मागणी आहे. आता या मागण्यांवर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि साखर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच राज्यातील साखर उद्योगात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या