‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीचा जागर
प्रवरानगर प्रतिनिधी , दि. २७ : व्यसनमुक्त युवा, सुदृढ समाज आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांनी सामाजिक परिवर्तनाचे वाहक बनावे, या उद्देशाने सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात राबविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातून आयोजित ग्रामस्वच्छता, ग्रामसेवा आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश दिला.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयात युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे होते. यावेळी स्थानिक ग्रामस्थ अनाप साहेब, गागरे साहेब आणि डुकरे पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, स्वतःच्या भविष्याची जपणूक करावी आणि राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि ग्रामस्थांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेत व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना वाव देण्यासाठी लंगडी, रस्सीखेच, धावण्याच्या स्पर्धा, व्हॉलीबॉल आणि संगीत खुर्ची अशा विविध पारंपरिक व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवत आपली क्रीडाक्षमता दाखवून दिली. या उपक्रमातून शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, सहकार्य, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित झाले.
क्रीडा स्पर्धांनंतर विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला. स्वच्छ परिसर, निरोगी जीवन आणि पर्यावरण संवर्धन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्यक्ष श्रमदानातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप राजभोज यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. एकनाथ निर्मळ, डॉ. अमित वाघमारे, डॉ. गंगाराम वडितके आणि डॉ. विजय कडनोर यांनी सहकार्य केले. विद्यार्थी, प्राध्यापक आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे अभियान यशस्वीरीत्या संपन्न झाले.

0 टिप्पण्या