‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाच्या निर्मितीतून रंगभूमीवर नवा प्रयोग; दर्जेदार संहितेची गरज अधोरेखित, तरुणाईच्या रंगभूमीकडे परतण्याचे स्वागत
मुंबई : मराठी रंगभूमीला लाभलेला प्रगल्भ आणि सुजाण प्रेक्षक ही कलाकारांसाठी मोठी ताकद आहे. वेगळा विषय आणि नावीन्यपूर्ण प्रयोग प्रामाणिकपणे सादर केला, तर मराठी प्रेक्षक त्याला मनापासून दाद देतात. त्यामुळेच आम्ही मराठी कलाकार खूप भाग्यवान आहोत, अशी भावना अभिनेत्री आणि निर्माती मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केली. ‘पुन्हा नक्की भेटू’ या नव्या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी रंगभूमी, बदलती नाट्यनिर्मिती, दर्जेदार संहितेची गरज आणि नव्या पिढीचा नाटकांकडे वाढता ओढा अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मुक्ता बर्वे यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे आणि नाटक संपल्यानंतरही दीर्घकाळ स्मरणात राहणारे नाटक सादर करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
काही नाटकांची नावे किंवा त्यांतील पात्रे कालांतराने विस्मरणात जातात; मात्र त्या कलाकृतींनी मनावर उमटवलेला ठसा कायम राहतो. काही नाटके केवळ मनातच नव्हे, तर आपल्या जगण्याच्या जाणिवांमध्येही रुजतात. ‘पुन्हा नक्की भेटू’ हे नाटकही प्रेक्षकांच्या मनात अशीच जागा निर्माण करेल, अशी अपेक्षा बर्वे यांनी व्यक्त केली.
नाटकाच्या प्रसिद्धीचे स्वरूप बदलले
पूर्वी वर्तमानपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नाटकांची माहिती पोहोचत असे. आता समाजमाध्यमांसह अनेक डिजिटल व्यासपीठे उपलब्ध झाल्याने नाटकाच्या प्रसिद्धीचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे नाट्यनिर्मितीइतकेच तिच्या प्रचारासाठी काम करणाऱ्या चमूचे महत्त्वही वाढले आहे, असे बर्वे यांनी नमूद केले.
मात्र, प्रसिद्धीची माध्यमे बदलली असली, तरी नाटक आणि मराठी प्रेक्षक यांच्यातील नाते कायम असल्याचे त्यांनी सांगितले. एखादा वेगळा विषय किंवा नवा प्रयोग प्रामाणिकपणे मांडला, तर प्रेक्षक त्याचे स्वागत करतात. हीच मराठी रंगभूमीची खरी ताकद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
चांगली संहिता लिहिणे हेच खरे आव्हान
‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाची संहिता त्यांचे बंधू देबू बर्वे यांनी लिहिली आहे. व्यावसायिकदृष्ट्या वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असले, तरी देबू यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे. नाटकाची संहिता लिहिणे ही मोठी जबाबदारी असून, केवळ लेखन करता येणे आणि प्रभावी नाट्यसंहिता लिहिणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे मुक्ता बर्वे यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षे रंगभूमीवर काम करताना आणि विविध संहिता वाचताना दर्जेदार नाट्यलेखनाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी सांगितले. ताकदीच्या नव्या संहिता पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे जुन्या गाजलेल्या नाटकांच्या पुनरुज्जीवनाकडे कल वाढत असावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मराठी नाटकांना भाषेच्या सीमा नाहीत
मराठी नाटकांना केवळ मराठी भाषिक प्रेक्षकांचाच नव्हे, तर सिंधी, गुजराती आणि पंजाबी भाषिक प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बर्वे यांनी सांगितले. प्रेक्षकांची मानसिकता समजून घेऊन कलाकृतीची निवड आणि सादरीकरण केल्यास त्याचा प्रभाव वाढतो, असा त्यांचा विश्वास आहे.
कलाकृतीचा आशय आणि सादरीकरण प्रभावी असेल, तर भाषेच्या सीमा ओलांडूनही ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. विविध भाषिक प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद हा मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा आणि प्रेक्षकांच्या कलासक्त वृत्तीचा प्रत्यय असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिग्दर्शिका मीरा वेलणकर यांच्यासोबतचा अनुभव समृद्ध करणारा
‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या दिग्दर्शिका मीरा वेलणकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आपल्यासाठी शिकवणारा असल्याचे मुक्ता बर्वे यांनी सांगितले. मैत्रीण म्हणून मीराशी असलेले नाते वेगळे असले, तरी दिग्दर्शिका म्हणून तिची कलात्मक दृष्टी आणि संवेदनशीलता विशेष भावते, असे त्या म्हणाल्या.
कलाकारामधील वेगळे पैलू ओळखून ते प्रेक्षकांसमोर आणण्याची क्षमता दिग्दर्शकामध्ये असावी लागते. मीराने आपली बलस्थाने ओळखून अभिनयातील सर्वोत्तम पैलू समोर आणण्यासाठी मदत केल्याचेही बर्वे यांनी नमूद केले.
डिजिटल युगातही तरुणाईला रंगभूमीचे आकर्षण
आजच्या तरुण पिढीला एका क्लिकवर जगभरातील दर्जेदार कलाकृती पाहण्याची संधी मिळते. तरीही प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकाचा अनुभव घेण्याची उत्सुकता तरुणांमध्ये वाढत असल्याचे मुक्ता बर्वे यांनी सांगितले.
करोनाकाळात डिजिटल माध्यमांवर विविध कलाकृती पाहिल्यानंतर प्रत्यक्ष कलानुभवाचे महत्त्व अधिक जाणवू लागले आहे. त्यामुळे तरुण प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
बदलत्या काळाशी जुळवून घेताना दर्जेदार लेखन, आशयपूर्ण सादरीकरण आणि प्रेक्षकांशी भावनिक नाते टिकवणे आवश्यक आहे. नव्या पिढीचा वाढता प्रतिसाद आणि विविध भाषिक प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम यामुळे मराठी रंगभूमीच्या भविष्यासाठी आशादायक चित्र निर्माण होत असल्याची भावना मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केली.

0 टिप्पण्या