दिलीप खेडकरांच्या घरावर एसीबीचा पहाटे छापा; १३.३० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा

 




अहिल्यानगर : वादग्रस्त माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २९) पहाटे छापा टाकला. नाशिक आणि अहिल्यानगर येथील पथकांनी एकाचवेळी केलेल्या या कारवाईत घरातील विविध कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा निष्कर्ष चौकशीत समोर आला आहे.

या प्रकरणी दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा १०२ टक्के अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

१९९५ ते २०२३ या कालावधीतील व्यवहारांची तपासणी

दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत झालेली वाढ आणि विविध आर्थिक व्यवहारांची एसीबीकडून तपासणी करण्यात आली. १९९५ ते २०२३ या कालावधीत त्यांनी केलेले आर्थिक व्यवहार, मिळकत आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यात आली.

अहिल्यानगर येथील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी २०१२ मध्ये दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार एसीबीकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

३० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

मंगळवारी पहाटे एसीबीच्या पथकाने भालगाव येथे छापा टाकला. नाशिक आणि अहिल्यानगर येथील पथकांनी समन्वयाने ही कारवाई केली. सुमारे ३० ते ४० अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाल्याची माहिती आहे. घरातील कागदपत्रे आणि मालमत्तेशी संबंधित नोंदी तपासण्यात आल्या.

तपासादरम्यान दिलीप खेडकर यांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार आणि शिरूर कासार या भागांत स्थावर मालमत्ता असल्याचे कागदपत्रांमधून समोर आल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक प्रतिज्ञापत्रामुळेही चर्चेत

दिलीप खेडकर हे यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले असून, त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत सनदी अधिकारी म्हणून काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी २०१९ मध्ये अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्यांना १३ हजार ७४९ मते मिळाली होती.

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असताना एवढ्या मोठ्या संपत्तीचा स्रोत काय, यावरून त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती.

पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात

दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांनीही लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या भालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच राहिल्या आहेत. खेडकर दाम्पत्याला पूजा आणि पियुष अशी दोन अपत्ये आहेत.

पूजा खेडकर यांचे नाव काही महिन्यांपूर्वी प्रशासकीय सेवेशी संबंधित वादामुळे देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आणि त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

आता त्यांच्या वडिलांविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीने केलेल्या कारवाईमुळे पाथर्डी तालुक्यात पुन्हा एकदा खेडकर कुटुंब चर्चेत आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या