सूर्यांश शेडगेचा चौकार; ऑस्ट्रेलिया अ २७४ धावांत गारद, भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य

 


भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मराठमोळ्या सूर्यांश शेडगेने आपल्या भेदक गोलंदाजीची छाप सोडली. सूर्यांशने अवघ्या सात षटकांत ४० धावा देत चार बळी घेतले. त्याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया अचा डाव २७४ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान आहे.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली. यश ठाकूरने सुरुवातीलाच दोन बळी घेत कांगारूंना धक्के दिले. अवघ्या ८७ धावांत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यानंतर नॅथन मॅकस्वीनी आणि कर्णधार विल सदरलँड यांनी डाव सावरत सहाव्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली.

मॅकस्वीनीने संयमी फलंदाजी करत १३५ चेंडूंत १३ चौकारांसह १२३ धावांची शतकी खेळी केली. तर सदरलँडने ६८ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७७ धावा फटकावल्या. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी निर्माण झाली होती.

सूर्यांशने मोडली जमलेली जोडी

ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा रुळावर येत असतानाच सूर्यांश शेडगेने सदरलँडला त्रिफळाचीत करत ही महत्त्वाची भागीदारी फोडली. त्यानंतर सूर्यांशने आणखी दोन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या शेपटावरही घाव घातला. शतकवीर मॅकस्वीनीला यश ठाकूरने बाद केले, तर अर्शद खानने ऑस्ट्रेलियाचा अखेरचा फलंदाज बाद करत डाव २७४ धावांवर संपवला.

हार्दिकच्या जागी संधी; सूर्यांशने साधला चौकार

हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे सूर्यांश शेडगेचा संघात समावेश करण्यात आला होता. मिळालेल्या संधीचे त्याने गोलंदाजीत दमदार प्रदर्शन करत चीज केले. चार बळी घेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला.आता २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी भारताच्या फलंदाजांवर आहे. साई सुदर्शन, प्रभसिमरन सिंग, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार यांच्यावर भारताच्या डावाची भिस्त असेल.

भारत अ संघ

साई सुदर्शन, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, अनुकुल रॉय, अर्शद खान, यश ठाकूर.

ऑस्ट्रेलिया अ संघ

सॅम कोन्स्टास, मिचेल ओवेन, जोश फिलिप (यष्टीरक्षक), नॅथन मॅकस्वीनी, लियाम स्कॉट, निखिल चौधरी, विल सदरलँड (कर्णधार), टॉड मर्फी, स्पेन्सर जॉन्सन, रिले मेरेडिथ, महली बियर्डमन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या