झरेकाठी वार्ताहर : संगमनेर तालुक्यातील खळी येथील डॉक्टर स्वाती नागरे यांना पी.एचडी प्राप्त - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या बळावर महिला कोणत्याही क्षेत्रात उच्च शिखर गाठू शकते, याचा प्रत्यय पिंप्रीची लेक आणि खळीची सून असलेल्या एम.ए., बी.एड., डी.एड., पीएच.डी. संपादन केलेल्या डॉ. सौ. स्वाती मुंढे-नागरे यांनी करून दाखवला आहे. मूळ रा. पिंप्री व खळी (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील असलेल्या आणि सध्या वैजापूर येथे स्थायिक असलेल्या डॉ. स्वाती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरकडून इंग्रजी साहित्य (English Literature) विषयात पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे.
डॉ. स्वाती यांनी इंग्रजी साहित्यातील स्त्रीवाद आणि स्त्री संवेदनशीलता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल आणि दर्जेदार संशोधन केले असून, त्यांच्या संशोधन प्रबंधाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.
या संपूर्ण संशोधन प्रवासात त्यांना मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष चौथाईवाले सर, विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आनंद उबाळे सर, बाह्य परीक्षक प्रा. डॉ. केतन गेडिया सर (अहमदाबाद, गुजरात), मौलाना आझाद महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. कलिमोद्दीन शेख सर, माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुस्तजिब खान सर, प्रा. डॉ. रविकांत जाधवर, प्रा. डॉ. भाऊसाहेब आंधळे, प्रा. डॉ. अनिल शहाणे, प्रा. डॉ. गायकवाड (गंगापूर) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी वेळोवेळी मदत केली.
डॉ. स्वाती यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा त्याग व पाठिंबा आहे. त्यांचे पती बाळू किसन नागरे सर हे सध्या जि. प. प्रा. शाळा लक्ष्मीवाडी (शिवराई), ता. वैजापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत पत्नीला शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन दिले. त्यांचे वडील श्री. ज्ञानदेव सोपान मुंढे (रा. पिंप्री) यांनी मुलीला उच्च शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा दिली. तर बंधू इंजिनियर अमोल मुंढे हे सध्या लंडन येथे उच्च शिक्षण घेत असून, बहिणीच्या यशाचे तेही साक्षीदार आहेत.
ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील लेक आज डॉक्टरेट मिळवते, ही खरोखरच अभिमानाची बाब असून, पिंप्री, खळी आणि वैजापूर या तिन्ही गावांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल , संगमनेर तालुक्यासह सर्वच स्तरातून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या