मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेते शक्ती कपूर यांनी मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील आलिशान अपार्टमेंट तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. सुमारे १,०५० चौरस फुटांच्या या अपार्टमेंटमधून त्यांना सुरुवातीला दरमहा अडीच लाख रुपये भाडे मिळणार आहे. या व्यवहाराची नोंदणी २६ जून २०२६ रोजी करण्यात आली आहे.
उपलब्ध मालमत्ता व्यवहाराच्या कागदपत्रांनुसार, हा अपार्टमेंट महालक्ष्मी पूर्वेकडील जी. बी. सकपाळ मार्ग आणि संत गाडगे महाराज मार्ग परिसरातील ‘पिरामळ महालक्ष्मी साऊथ टॉवर’मध्ये आहे. करारानुसार, भाडेकरूने ७.५ लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम दिली आहे.
तीन वर्षांत भाड्यात टप्प्याटप्प्याने वाढ
‘लीव्ह अँड लायसन्स’ करारानुसार, पहिल्या वर्षी या अपार्टमेंटचे मासिक भाडे अडीच लाख रुपये असेल. दुसऱ्या वर्षी ते २.६२ लाख रुपये, तर तिसऱ्या वर्षी २.७५ लाख रुपये प्रतिमहिना होईल.
हा फ्लॅट पूर्णपणे सज्ज असून त्यामध्ये सोफा, खुर्च्या, कपाटे, चार वातानुकूलन यंत्रे, पाणी शुद्धीकरण यंत्र, फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, स्वयंपाकघरातील हॉप आणि चिमणी तसेच जेवणाचे टेबल यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
करारातील अटीनुसार, या अपार्टमेंटचा वापर केवळ निवासी कारणांसाठी करता येणार आहे. व्यावसायिक कारणांसाठी त्याचा वापर करता येणार नाही.
देखभाल आणि वीजबिलाची जबाबदारी वेगळी
करारानुसार, इमारतीचे देखभाल शुल्क, कर आणि इतर संबंधित शुल्क घरमालकांकडून भरले जाणार आहेत. मात्र, भाडेकरूच्या वापरानुसार येणारे वीजबिल त्यालाच भरावे लागणार आहे.
या व्यवहारात शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर हे घरमालक म्हणून, तर अक्षत खेतान हे भाडेकरू म्हणून नमूद करण्यात आले आहेत. या मालमत्ता व्यवहाराबाबत श्रद्धा कपूर किंवा शक्ती कपूर यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
६.२४ कोटींना खरेदी केला होता फ्लॅट
विशेष म्हणजे, श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर यांनी हा लक्झरी अपार्टमेंट जानेवारी २०२५ मध्ये ६.२४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. उपलब्ध मालमत्ता नोंदणीच्या माहितीनुसार, ही मालमत्ता ‘ग्लायडर बिल्डकॉन रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून खरेदी करण्यात आली असून, या व्यवहाराची नोंदणी १३ जानेवारी २०२५ रोजी झाली होती.
अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर हा फ्लॅट भाड्याने देण्यात आल्याने त्यातून कपूर कुटुंबाला नियमित भाडे उत्पन्न मिळणार आहे.
श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाची चर्चा
दरम्यान, श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे. ती ‘ईठा’ या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

0 टिप्पण्या