एमपीएससीच्या पेपरफुटीवर फडणवीसांची भूमिका स्पष्ट; ‘दोषी आढळल्यास राष्ट्रपतींकडे शिफारस’


 मुंबई : देशातील संविधानिक आणि लोकशाही संस्था कुचकामी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे संविधान नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, असे सांगितले जाईल. संविधान हातात घेऊनच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राजधानी दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आपले अभिनंदनही केले होते. मात्र, राजकीय नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रकार योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील सर्व लोकशाही संस्था संपवाव्यात, अशा टोकाच्या भूमिकेपर्यंत काही जण पोहोचले आहेत. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून त्यांच्या मागण्यांवर आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. राजकारणाला राजकारणानेच उत्तर दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

‘एमपीएससी अध्यक्षांना हटवणे सरकारच्या हातात नाही’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. संविधानातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवर राष्ट्रपतीच आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवू शकतात, असे त्यांनी सांगितले.

सध्याचे आयोगाचे अध्यक्ष पेपरफुटीच्या घटनेच्या वेळी पदावर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची मागणी कितपत योग्य आहे, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.

मात्र, विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वास कायम राहावा यासाठी आयोगाच्या आजी-माजी अध्यक्षांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास संविधानातील अनुच्छेद ३१७ नुसार संबंधितांविरोधात कारवाईसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत राज्यपालांकडे सरकारने विनंती केल्याची माहितीही त्यांनी दिली.

दुष्काळात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत पिण्याच्या पाण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे २३ हजार गावांचा सर्वेक्षण करण्यात आला असून, केंद्र सरकारची समिती ११ तारखेला राज्याच्या पाहणीसाठी येणार आहे.

केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी निधी आणि आवश्यक मदत लवकर मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीत महायुती एकत्र

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाचे संकेत दिले. गोकुळची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असून, सध्या हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली त्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जाईल. या संदर्भात आपल्या पातळीवर स्वतंत्र निर्णय घेतला जाणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या