मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मुंबईत सीजेपीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीमुळे देशातील लोकशाहीसमोर प्रश्न निर्माण झाले असून, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप दिपके यांनी केला. ‘ज्ञानू, इट्स डन ब्रो… आता राजीनामा द्या,’ असे म्हणत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘गांधींचा विचार कधीच संपणार नाही’
गांधी जयंतीच्या दिवशी नागरिकांच्या अधिकारांसाठी आंदोलन करणे हीच महात्मा गांधींना मोठी श्रद्धांजली असल्याचे दिपके यांनी सांगितले. गांधीजींना संपवून त्यांचा विचारही संपवता येईल, असा प्रयत्न पूर्वी झाला; मात्र गांधींचा विचार आजही जिवंत आहे आणि पुढेही राहील, असे ते म्हणाले.
“गांधीजी या देशाचा आत्मा आहेत. आमच्यासारखे युवक या देशात आहेत तोपर्यंत गांधींचा विचार जिवंत राहील. गांधींच्या विचारानेच देश पुढे जाईल,” असे दिपके यांनी सांगितले.
मोदींवरही दिपकेंचा निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नॉन-बायोलॉजिकल’ वक्तव्याचा संदर्भ देत दिपके यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. स्वतःची तुलना महात्मा गांधींशी करू नये, असे सांगताना गांधी, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
गांधीजी देशाचा आत्मा असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचा कणा आणि पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे मन आहेत, अशी उपमा देत या तिन्ही नेत्यांच्या योगदानावर दिपकेंनी भर दिला.
‘मोदींनी लोकांना रांगेत उभे केले’
पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना दिपके यांनी कोरोना काळातील लसीकरण, नोटबंदी आणि मतदार नोंदणीच्या मुद्द्यांचा संदर्भ दिला.
“मोदींना दुसरे काही काम येत नाही, फक्त लोकांना रांगेत उभे करतात,” असा आरोप त्यांनी केला. नोटबंदीच्या काळात नागरिकांना बँकांच्या रांगेत, कोरोना काळात लसीसाठी आणि आता मतदानाच्या नोंदीसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याची टीका त्यांनी केली.
स्वतःला गरीब आईचा मुलगा आणि फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींनी देशातील सामान्य नागरिकांनाही संघर्षाच्या परिस्थितीत आणले, असा आरोपही दिपके यांनी केला.
लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा
देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा उल्लेख करत दिपके यांनी लोकशाही संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. मतदानाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनातून निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
0 टिप्पण्या