'दिलीप प्रभावळकर या दिग्गज कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळावा', महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी व्यक्त केली इच्छा


एखाद्या कलाकाराचा मोठेपणा केवळ त्यानं साकारलेल्या भूमिकांमध्ये नसतो, तर काळ बदलला, माध्यमं बदलली, तरी त्याच्यातील सर्जनशीलतेची ज्योत तेवत ठेवण्यात असतो. मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या दोघांचाही कलाप्रवास याची साक्ष देतो. गतवर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेल्या अशोक सराफ यांनी आता मराठी मनोरंजनसृष्टीतील दिलीप प्रभावळकर या दिग्गज कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळावा, असं मटा कट्टा वर सांगितल .


मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्यादिलीप प्रभावळकर यांचं योगदान मोठे आहे. व्यक्तिरेखांमधील बारकावे टिपण्याची हातोटी, भूमिकांना स्वतःच्या कल्पकतेनं दिलेली वेगळी ओळख आणि सातत्यानं काहीतरी नवं करण्याची धडपड, यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. त्यांचं लेखन आणि प्रयोगशील वृत्तीदेखील महत्त्वाची आहे. याच गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करत अशोक सराफ यांनी प्रभावळकरांच्या नावाचा विचार व्हावा, असं म्हटलं.

अशोक सराफ म्हणाले, 'दिलीप प्रभावळकर याला पद्मश्री मिळायला हवा. कारण एखाद्या कलाकाराने एका माध्यमात यशस्वी होणं वेगळे आणि नाटक, सिनेमा आणि टीव्ही मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणं वेगळे. दिलीपनं या तिन्ही माध्यमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ अभिनय करत नाही, तर सातत्यानं नवनवीन प्रयोग करत राहतो. त्याचं लिखाण सुरू असतं. त्याची काम करण्याची ऊर्मी आजही कायम आहे. वेगवेगळ्या भूमिका, निरनिराळे प्रयोग आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळ करण्याची त्याची धडपड कौतुकास्पद आहे. महत्त्वाचं म्हणजे, तो जे करतो, ते यशस्वी करून दाखवतो. त्याच्या या सातत्याचा आणि कलाप्रवासाचा योग्य सन्मान व्हायला हवा. म्हणूनच पद्मश्रीसाठी दिलीप प्रभावळकर या नावाचा विचार व्हावा.'

'एक डाव भुताचा' या चित्रपटातील अशोक सराफ आणि दिलीप प्रभावळकर यांची जोडी विशेष गाजली. त्यानंतर 'चौकट राजा', 'मी शिवाजी पार्क' अशा काही चित्रपटांतही ते एकत्र दिसले. अशोक सराफ यांची अफाट विनोदशैली आणि दिलीप प्रभावळकर यांचा संयत, सूक्ष्म अभिनय याचं समीकरण प्रेक्षकांसाठी नेहमीच खास ठरलंय. अलीकडेच दशावतार' या मराठी चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या अद्वितीय अभिनयाचीही चर्चा झाली. वयाच्या ऐशिव्या वर्षी भूमिकांमधून नवं आव्हान स्वीकारण्याची त्यांची तयारी त्यांच्या कलाप्रवासाचं वैशिष्ट्य अधोरेखित करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या