नवी दिल्ली : निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेली २९ वर्षीय नेहा बोरा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांना चकवा देत, बॅरिकेड्स ओलांडत आणि ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या नेहाने आता इंडिया आघाडीच्या मोर्चात सहभाग नोंदवला. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बसमध्ये दिसली. याच बसमध्ये सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव हेदेखील उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे नेहा बोरा चर्चेत आली आहे. दिल्लीतील विविध ठिकाणी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडून आंदोलनस्थळी पोहोचणे, पोलिसांच्या कारवाईला न जुमानता घोषणाबाजी करणे आणि ताब्यात घेतल्यानंतरही आपली भूमिका ठामपणे मांडणे, यामुळे तिचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
बॅरिकेड्स ओलांडून आंदोलन; नेहाची देशभर चर्चा
आर. के. आश्रम मेट्रो स्थानक, कनॉट प्लेस आणि विजय चौक परिसरात आंदोलनादरम्यान नेहा पोलिसांना चकवा देताना दिसली. तिच्या या कृतींचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनात सहभागी झालेल्या नेहाने आपल्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत तिने, आपण व्यावसायिक धावपटू नसल्याचे सांगत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आपल्याला धावण्यास भाग पाडल्याची मिश्किल टिप्पणी केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही तिची सुरू असलेली घोषणाबाजी आणि आंदोलनातील सहभाग चर्चेचा विषय ठरला.
उत्तराखंडमध्ये जन्म; शालेय जीवनातच वैचारिक जडणघडण
नेहा बोराचा जन्म उत्तराखंडमधील खटीमा येथे झाला. तिचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत असत. त्यामुळे नेहाचे बालपण देशातील विविध भागांतील लष्करी छावण्या आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात गेले.
तिने पश्चिम बंगालमध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात तिच्या वैचारिक जडणघडणीला दिशा मिळाल्याचे ती मानते. चारू मजुमदार, चिलीचे प्रसिद्ध कवी पाब्लो नेरुदा आणि लेखिका अरुंधती रॉय यांच्या विचारांचा तिच्यावर प्रभाव पडला. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची भूमिका घडवण्यात या विचारांचा वाटा असल्याचे तिच्या वैचारिक प्रवासातून दिसून येते.
आंदोलनातून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी
निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनापासून ते इंडिया आघाडीच्या मोर्चातील सहभागापर्यंत नेहा बोराचा प्रवास सध्या चर्चेत आहे. राहुल गांधी आणि योगेंद्र यादव यांच्यासोबत बसमध्ये दिसल्याने तिच्या सहभागाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधले गेले आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विरोधकांनी सुरू केलेल्या आंदोलनात नेहासारख्या कार्यकर्त्यांचा सहभाग आंदोलनाला नवा चेहरा देत आहे. मात्र, या आंदोलनातून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न, त्यावरील निवडणूक आयोगाची भूमिका आणि पुढील राजकीय घडामोडी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या