गुन्हेगारांबद्दल भाजपाची भूमिका दुटप्पीजाणीवपूर्वक
मुंबई प्रतिनिधी
गुन्हेगारी मानसिकतेला कोणताही धर्म नसतो, ती एक मानवी प्रवृत्ती आहे, त्यामुळे गुन्हेगारांची धर्माच्या आधारावर विभागणी करणे किंवा अपराध्याचा धर्म पाहून त्या धर्माला लक्ष्य करणे, हे भारतीय संविधानाच्या समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला ‘टाइम बॉम्ब’ ठरवायचे आणि इतरांनी गुन्हा केला तर तो ‘फुलबाजा’ का? असे दुहेरी निकष भाजपकडून जाणीवपूर्वक पुढे केले जात आहेत असा हल्लाबोल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत पुढे म्हणाले की, कुर्ल्यात मुलामुलींना काही जणांनी मारहाण केली हे अत्यंत निषेधार्ह आहे. यातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र, राज्यात अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत असताना केवळ निवडक घटनांना धार्मिक रंग देऊन राजकीय ध्रुवीकरण करणे चुकीचेच आहे. राज्यातील ढासळती कायदा, सुव्यवस्था ही गंभीर चिंतेची बाब आहे. बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली दहशत असो किंवा पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटना असोत, परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. महिलांवर तर खुलेआम अत्याचार होत आहेत. गुन्हेगाराचा धर्म पाहू नका, त्याने केलेला गुन्हा पाहा. गुन्हेगारीचा बिमोड आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले, तरच एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा उजळेल. नाहीतरी भाजपाच्या राज्यात बिहार बरा अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

0 टिप्पण्या