नवी दिल्ली
भारतात आयोजित करण्यात आलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) सिव्हिलायझेशनल डायलॉगसाठी पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री डॉ. मुसादिक मलिक यांना निमंत्रित केल्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी शुक्रवारी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून, पाकिस्तानच्या मंत्र्यांचे भारतात ज्या पद्धतीने स्वागत केले जात आहे, ते पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. भारताविरुद्ध दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला या कार्यक्रमासाठी निमंत्रण का देण्यात आले, असा थेट सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक हे भारतात येऊन हसतमुखाने या स्वागताचा आनंद घेत आहेत, मात्र याच व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी भारतीयांचे हात कापण्याची आणि रक्त सांडण्याची उघड धमकी दिली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
पाकिस्तानने अद्याप दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवलेले नसताना पंतप्रधान मोदींचे सरकार त्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात व्यस्त असून, त्यांना बिर्याणी, कबाब आणि खीर खाऊ घातली जाणार का, असा उपरोधिक सवाल सुप्रिया श्रीनेत यांनी विचारला. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानशिवाय केंद्र सरकारचे काम अडते का, अशी टीका करत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असून सरकारनेही तेच धोरण अवलंबावे, असे त्या म्हणाल्या. मोदी सरकार आपल्या भूमिकेत सातत्याने बदल करत असल्याचा आरोप करताना श्रीनेत यांनी पंतप्रधानांच्या पूर्वीच्या लाहोर दौऱ्याचा आणि 'ऑपरेशन सिंदूर' अचानक थांबवण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला. पहलगाम हत्याकांडातील हुतात्म्यांच्या चिता अद्याप थंड झालेल्या नसताना पाकिस्तानच्या मंत्र्यांसाठी रेड कार्पेट अंथरणे हे अत्यंत संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे मंत्री डॉ. मुसादिक मलिक हे शुक्रवारी भारतात दाखल झाले असून शनिवार आणि रविवार दरम्यान होणाऱ्या या संवादात ते आंतर-सभ्यता संवादावर पाकिस्तानची भूमिका मांडणार आहेत.

0 टिप्पण्या