पंढरपूर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूरहून मुंबईला जाण्यासाठी हेलिकॉप्टर निघण्याच्या तयारीत असतानाच ही अडचण निर्माण झाली, परिणामी उड्डाण रद्द करावे लागले. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आकाशात झेपावू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचा सर्व ताफा पूर्णपणे सुखरूप आहे. या प्रकारानंतर शिंदे यांनी रस्ते मार्गाने पुणे मार्गे मुंबईकडे प्रस्थान केले.
कार्तिकी एकादशीच्या पूर्वतयारीचा तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व चंद्रभागा नदी तीरावरील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. आपला दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना हेलिकॉप्टरमध्ये हा बिघाड झाला.
विशेष म्हणजे, याआधी मे महिन्यातही एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासात मोठे संकट ओढवले होते. त्या वेळी प्रतिकूल हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे हेलिकॉप्टरचा मार्ग विचलित झाला होता. पक्षातील एका पदाधिकाऱ्याच्या घरच्या लग्नसमारंभासाठी शिंदे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅडवरून मुरबाडकडे निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास हेलिकॉप्टर ऐरोली भागात पोहोचताच हवामान खराब झाले आणि दृश्यमानता कमालीची घटली. संभाव्य धोका लक्षात घेता पायलटने समयसूचकता दाखवत हेलिकॉप्टर जुहू येथील पवन हंस हेलिपॅडवर सुरक्षितपणे उतरवले होते. त्या वेळी शिंदेंसोबत स्वीय सहायक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बाळसिंह राजपूत, जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रुडकर, सुरक्षा रक्षक व विमान कंपनीचे अधिकारी प्रवास करत होते आणि सर्वजण सुरक्षित बचावले होते.

0 टिप्पण्या