ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ

२०१८ च्या मानहानी खटल्यात साकेत कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी


नवी दिल्ली

लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी याच्या कायदेशीर अडचणींमध्ये मोठी भर पडली असून, दिल्लीतील साकेत न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. २०१८ साली दाखल झालेल्या एका जुन्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने हे कडक पाऊल उचलले आहे. ध्रुव राठी सध्या जर्मनीमध्ये राहत असून या खटल्याची पुढील सुनावणी येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणातील तक्रारदार विकास सांस्कृत्यायन यांनी असा आरोप केला होता की, राठीने 'बीजेपी आयटी सेल पार्ट २' या नावाने एक व्हिडिओ जारी करून त्यांच्याबद्दल खोटे आणि बदनामीकारक दावे केले होते. मे २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडिओत राठीने असा दावा केला होता की, आपली प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलने एका व्यक्तीला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ राठीच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला होता आणि तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही तो रीट्वीट केला होता. याआधी ऑक्टोबर महिन्यात न्यायालयाने ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले होते, कारण नोटीस देण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याचा पत्ता बंद मिळाला होता. तसेच, ८ ऑक्टोबर रोजी ध्रुव राठी भारतात आला असताना, दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनात सामील होण्यापूर्वीच पोलिसांनी गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या